Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या नसून आत्महत्याच; AIIMS चा अंतिम अहवाल CBI कडे सुपूर्त
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी AIIMS (All India Institute of Medical Sciences) ची फॉरेन्सिक टीम (Forensic Team) सुशांतच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास करत होती. दरम्यान, हा तपास पूर्ण झाला असून याचा अंतिम वैद्यकीय अहवाल सीबीआय (CBI) कडे सुपूर्त करण्यात आला आहे. यात सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. "आम्ही आमचा अंतिम अहवाल तयार केला असून यातून स्पष्ट होते की गळफास घेऊनच सुशांतचा मृत्यू झाला आहे," असे AIIMS च्या फॉरेन्सिक टीमचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता (Dr. Sudhir Gupta) यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

सुशांतच्या केवळ मानेवर गळफास घेतल्याच्या खूणा होत्या. शरीरावर इतर कुठेही जखमा किंवा खूणा आढळून आल्या नाहीत. तसंच कोणत्याही झटापटीचे निशाण देखील बॉडीवर नव्हते, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले आहे. डॉ. गुप्ता हे AIIMS च्या फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 7 डॉक्टरांची टीम सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत होती. टीमचा तपास पूर्ण झाला असून ते त्यांच्या अंतिम निष्कर्षावर पोहचले आहेत. तसंच शरीरात कोणत्याही प्रकारचे विषाचे नमुने सापडले नाहीत. पूर्ण तपासणीनंतर फास घेतल्यामुळे येणाऱ्या खुणाच गळ्यावर दिसून आल्या, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

दरम्यान, सुशांतचे कुटुंबिय आणि वकील यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. परंतु, AIIMS च्या या रिपोर्टनंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाला नक्कीच वेगळे वळण मिळू शकते. तसंच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा शोध ड्रग्सच्या दिशेने होत असून याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 18 जणांना NCB ने अटक केली आहे. (मुंबई उच्च न्यायालयाने रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि इतरांच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृतअवस्थेत आढळला होता. त्यानंतर कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा आरोप करत पटना पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मुंबई-पटना पोलिसांच्या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले गेले. मात्र आता हे प्रकरण नेमके काय वळण घेणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.