Shimla Mirchi Trailer: तब्बल 9 वर्षांनतर हेमा मालिनी यांचे पुनरागमन; 'शिमला मिर्ची'मध्ये करणार राजकुमार राव सोबत रोमान्स (Video)
Shimla Mirchi Trailer (Photo Credits: YouTube/ Viacom18 Studios)

सध्या बॉलीवूडमध्ये अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत, अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. असाच एक नवीन आणि फ्रेश विषय घेऊन दिग्दर्शक रमेश सिप्पी (Ramesh Sippy) आपल्या भेटीला येत आहेत. यामध्ये एक आईच्या वयाची स्त्री आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणाच्या प्रेमात पडते आणि त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ पाहायला मिळणार आहे.

‘शिमला मिर्ची’ (Shimla Mirchi) असे या चित्रपटाचे नाव असून, महत्वाचे म्हणजे या चित्रपटाद्वारे हेमा मालिनी (Hema Malini) तब्बल 9 वर्षांनतर चित्रपट सृष्टीमध्ये पुनरागमन करत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजकुमार राव (Rajkummar Rao) मध्यवर्ती भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Shimla Mirchi Trailer -

हा चित्रपट एक रोमँटीक कॉमेडी आहे. राजकुमार रावला प्रेमविवाह करायचा असतो, मात्र कितीही प्रयत्न केला तरी मुलीला प्रपोज करणे त्याच्याकडून होत नाही. अखेर आपल्या भावना तो प्रेमपत्राद्वारे मुलीपर्यंत पोहचवण्याचा विचार करतो. त्यानुसार एक रोमँटीक पत्र लिहून ते मुलीच्या घरी पाठवतो. मात्र चुकून ते पत्र मुलीच्या आईच्या म्हणजेच हेमा मालिनीच्या हाती लागते. अर्थातच ते पत्र वाचून ती राजकुमारच्या प्रेमात पडते. ही गोष्ट पुढे वाढत जाऊन अगदी राजकुमारच्या घरी लग्नाची बोलणी करायला येईपर्यंत पोहचते. अशा परिस्थितीत उडालेला गोंधळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा: आपल्या मुलीच्या ट्रोल्स विषयी काय म्हणाली अभिनेत्री काजोल? पाहा कोणत्या शब्दात व्यक्त केला संताप)

चित्रपटात राजकुमार राव, हेमा मालिनी यांच्यासोबत नकुल प्रीतसिंहची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांचे असून, संगीत मित बोस आणि अंजन यांचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे काम 2014 मध्ये सुरु झाले होते. त्यानंतर आता तब्बल 5 वर्षांनतर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे बरेचसे शुटींग शिमला इथे पार पडले आहे.