Kajol and her daughter Nyasa (Photo Credits: Instagram)

Kajol On Her Daughter Getting Trolled: बॉलीवूडचं ग्लॅमर्स विश्व जितकं दुरून चांगलं दिसतं तितकंच कलाकारांसाठी ते वाईटही ठरतं. कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी मत मांडणं असो वा एखादा फोटो असो, कोणत्याही कारणावरून सेलेब्सना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. पण आता हे ऑनलाईन ट्रोलिंग फक्त सेलेब्सपुरता मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबियांवरही कधीकधी नेटकरी टीका करताना दिसतात. काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा ही देखील अनेकदा सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होताना दिसते.

कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वागण्यामुळे, अनेक ट्रोल्स न्यासावर सोशल मीडियावर टीका करत असतात. आणि यामुळेच ती नेहमी चर्चेत असते. मात्र काजोलने याबद्दल बोलताना प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘ती सेलिब्रिटी किड असल्यामुळे तिला अशाप्रकारे ट्रोल केलं जात आहे’, असं काजोलने म्हटलं आहे.

इतकंच नव्हे तर काजोलने 'लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रोल्सना असाही प्रश्न विचारला आहे की, "न्यासाच्या जागी तुमचे आई-वडिल किंवा कुटुंबीय असते तर तुम्ही काय केलं असतं?"

ट्रोलिंगविषयी बोलताना ती या मुलाखतीत म्हणाली की, “ट्रोल करणाऱ्यांच्या डोक्यात कसला विचार असतो हे माहित नाही. परंतु, हेच जर तुमच्या बहिणी किंवा आईच्या बाबतीत झालं असतं तर तुम्ही शांत बसला असतात का? आणि ती जर सेलिब्रिटी किड नसती तर या ट्रोलिंगला तुम्ही छळवणूक म्हणणार नाही का? आजकाल तर अशा लोकांवर कारवाईसुद्धा केली जाते. ट्रोलिंग हे जरी त्याला नाव दिलं असलं तरी ती एक प्रकारची दादागिरीच आहे. ट्रोल करणारे मूर्ख असतात. त्यांना माहित नसतं की ते काय करतायत.”

दरम्यान, या आधी अभिनेता अजय देवगण यानेसुद्धा न्यासाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, “सेलिब्रिटींची मुलं असल्याचा फटका त्यांनी का भोगावा? कधीकधी ते इतके लहान असतात की फोटोग्राफर्ससमोर कसं वागावं हे देखील त्यांना नाही समजत. त्यांना मुक्त वावरण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं.”