शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडचा (Shemaroo Entertainment Ltd.) सीईओ हिरेन गडा (Hiren Gada) याच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) विभागाने शेमारू एंटरटेनमेंटचा मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा याच्यासह तिघांना मुंबईत 70.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक अतुल मारू आणि मुख्य वित्त अधिकारी अमित हरिया यांचा समावेश आहे.
या सर्वांनी कोट्यवधी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटवर फसवणूक केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने बुधवारी हिरेन गडा याला अटक केली.
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिरेन गडा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावा करण्यासाठी अनेक बनावट कंपन्या तयार केल्या आहेत. हिरेन गडा व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या फसवणुकीमुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. वृत्तानुसार, हिरेन गडा याने कोणतीही वस्तू किंवा सेवा न देता 70.25 कोटी रुपयांच्या टॅक्स क्रेडिटचा नफा घेण्यासाठी बनावट कंपन्या तयार केल्याची कबुलीही दिली आहे. (हेही वाचा: Economic Offenders and Fugitives: गेल्या चार वर्षात आर्थिक गुन्हेगार आणि फरार यांच्याकडून 1.8 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेची वसूली- Minister Dr Jitendra Singh)
गडा CGST कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हिरेन गडा याला गुरुवारी मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात त्याच्या वकिलांनी सांगितले की, जीएसटी अधिकाऱ्यांनी त्याला 24 तासांपेक्षा जास्त काळ बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी जीएसटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बुधवारी गडा याची चौकशी करण्यात आली आणि त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडा याला न्यायालयात हजर करण्यात आले. वृत्तानुसार, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शेमारूच्या सीईओची न्यायालयीन कोठडी नाकारली.