
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहाना खानने अलिबाग इथं कोट्यवधींची शेतजमीन खरेदी केली होती. आता पुन्हा एकदा तिनं जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी सुहानानं 1 जून रोजी दीड एकर जमीन खरेदी केली होती. जमिनीचं रजिस्ट्रेशनदेखील 1 जून रोजी झालं होतं. या जमिनीची एकूण किंमत 12.91 कोटी रुपये असल्याचं म्हटलं गेलं होतं. दीड एकर जमिनीवर 2218 स्क्वेअर फूटवर बांधकामही करण्यात आले आहे. सुहानानं आता अलिबागजवळच नऊ ते दहा कोटींच्या किंमतीची शेत जमीन खरेदी केली आहे. 13 फेब्रुवारी रोजी या जमिनीचं रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती आहे तर, या जागेसाठी तिनं 57 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचं म्हटलं जात आहे. (हेही वाचा - Suhana Khan Buys Row Houses: शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केले 12 कोटी रुपयांचे 3 रो हाउस)
अलिबागइथं सुहानाच्या वडिलांचं म्हणजेच शाहरुखचं अलिशान फार्महाऊस आहे. अनेकदा तो इथं पार्टी करण्यासाठी जात असतो. आता सुहानानंही अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. ती देखील फार्महाऊस बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनीही इथं अलिशान फार्महाऊस खरेदी केला. या फार्महाऊसची किंमत तब्बल २२ कोटींच्या घरात आहे. तर क्रिकेटपटू रोहित शर्मानंही गेल्यावर्षी इथं जमीन तसंच फार्महाऊस खरेदी केलं आहे. तर विराट अनुष्काचं स्वप्नातं फार्महाऊसही अलिबागमध्ये आहे.