Rhea Chakraborty On Jail Experience: सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तुरुंगातील काळ 'सर्वात वाईट नरक होता'- रिया चक्रवर्ती
Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook/Instagram)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात निर्माण झालेल्या वादाच्या केद्रस्थानी राहिलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने आपल्या तुरुंगातील अनुभवाबद्दल नुकतेच भाष्य केले. तुरुंगातील अनुभवाबाबत (Rhea Chakraborty Jail Experience) बोलताना 'सर्वात वाईट नरक' अशा शब्दात तिने या काळाचे वर्णन केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्या काळातील अनुभवाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिया बोलत होती. या संवादाचा एक व्हिडिओही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सुशांतसिंह याने 14 जून 2020 आत्महत्या केली. आरोप करण्यात आला की, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. या प्रकरणाचे त्या काळात खूप राजकारण झाले. बिहार पोलीस विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि पोलीस असा संघर्षही पाहायला मिळाला. आत्महत्येचा आणि ड्रग्ज प्रकरणाचा संबंधही या काळात लावण्यात आला. या प्रकरणात सर्वाधिक झळ बसली ती सुशांत याची माजी प्रेयसी असलेल्या रिया चक्रवर्ती हिस. त्या काळातील अनुभवाबाबत एका कार्यक्रमात नुकतेच भाष्य केले.

इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रियाने इंग्रजीत कथन केलेल्या वक्तव्याचा मराठी अनुवाद असा की, 'तो काळ माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक होता. मला समाजातून मुळापासून उपडून टाकत तुरुंगात टाकण्यात आले होते. असे भासवले जात होते की, तुम्ही समाजासाठी अत्यंत अयोग्य आहात. मी स्वत:च्या व्यक्तीमत्वाबद्दल ज्या काही गोष्टी निर्माण केल्या होत्या त्या सर्व तुटून गेल्या होत्या. हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट नरक होता.'

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला मुंबईतील भायकळा कारागृहात तब्बल 28 दिवस राहावे लागले होते. सुशांत प्रकरणात अंमली पदार्थ (ड्रग्ज) प्रकरणही आल्याने रियाच्या अडचणी वाढल्या होत्या. ज्यामुळे तिला तुरुंगाची हवा खावी लागली. या प्रकरणात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाने तिच्यासोबत अत्यंत पाशवी वर्तन केले. वार्तंकण आणि ट्रोलिंग करताना अत्यंत तीव्र पातळी गाठण्यात आली. ज्यामुळे रिया आणि तिच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, रिया आता सावरली असून हळूहळू आणि खंबीरपणे सामन्य जीवनात पदार्पण करत आहे. तिने म्हटले की, तो काळ माझ्यासाठी अत्यंत नैराश्येचा होता, जो नरकापेक्षा कमी नव्हता. मात्र, तुम्ही जर आयुष्यात सकारात्मक असाल तर कोणतीही आव्हाने तुम्ही पार करु शकता. वाईट काळ तुमच्यावर फार काळ राहात नाही, असेही तिने म्हटले. दरम्यान, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्याच्या मृत्यूनंतर रियाची मीडिया ट्रायल करण्यात आली. तिचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. अंमली पदार्थाशी संबंधित एका प्रकरणात तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती.