वेबसिरीजमधील महिलांच्या बीभत्स व अश्लिल चित्रणावर येणार बंधने; महाराष्ट्र पोलिसांकडून कारवाई सुरु- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन अशा वेबसिरीजवर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करत आहे, अशी माहिती गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपती यांच्याकडे गेले असून राष्ट्रपती कार्यालयाकडून त्याला मान्यता‍ मिळाल्यानंतर त्या माध्यमातून महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असेही वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी गृह, सार्वजनिक आरोग्य, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासंबंधित सन 2021-22 या वर्षाच्या पुरवणी मागण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी गृह विभागाच्या चर्चेस उत्तर देतांना गृह मंत्री वळसे पाटील बोलत होते.

वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींबाबत  गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमधील देहप्रदर्शन आणि इतर दृश्यांवर बंधने घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रसारण विभागाशी बोलून आक्षेपार्ह वेब सिरीजवर बंदी घालण्याबाबत पाउले उचलली जातील.

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, रौलेट या ऑनलाईन गेम्ससंदर्भात आपल्याकडे अजून सक्षम कायदा नाही. पण कुणी महसूल बुडवून फसवणूक करत असेल तर त्यामध्ये गृहखाते गंभीरपणे लक्ष घालेल.

शक्ती विधेयकाबाबत वळसे-पाटील म्हणाले, शक्ती विधेयक आता दोन्ही सभागृहे व राज्यपालांकडून मंजूर होऊन राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी गेले आहे. राष्ट्रपती कार्यालयाशी संपर्क साधून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी विरोध पक्षानेही प्रयत्न करावा, जेणेकरून महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देता येईल. शासकीय नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथियांना तीन टक्के आरक्षण देण्याची मागणी पुढे आली असून, त्यावरही येत्या काळात लक्ष घालू. बलात्कार प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी तरतूदी करण्यात येत आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच राज्यशासन खटले मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तथापि, आंदोलन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करुनच आंदोलन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा: बच्चन पांडे ते गंगूबाई काठियावाडी पर्यंत चित्रपटगृहातील 'हे' मोठे चित्रपट प्रदर्शित होणार OTT वर)

बहुतेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील पोलिस स्थानकांच्या इमारती आणि पोलिसांच्या निवासस्थानांसंबंधी काही मागण्या यावेळी केल्या होत्या. त्यावर मार्च पूर्वी ८७ इमारतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. येणाऱ्या काळात आणखी निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. २०२१-२२ मध्ये ७२९ कोटींच्या निधीची मागणी होती, त्यातील ३६४ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. अर्थ विभागाकडून उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना चांगली वाहने देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही वळसे-पाटील यांनी सांगितले.