Free Auto Service (Photo Credit: Twitter)

'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनाआधी या चित्रपटाची जोरात चर्चा सुरू आहे. चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेक मुस्लीम संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. अशात आता महाराष्ट्रातील पुणे, आळंदी येथील एक ऑटोरिक्षा चालक 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांना मोफत प्रवास देणार आहे. साधू मगर असे या चालकाचे नाव असून सध्या त्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या छायाचित्रात मगर हे त्यांच्या ऑटोरिक्षाजवळ उभे असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या ऑटोरिक्षावर एक मोठे बॅनर लावले आहे. या बॅनरवर लिहिले आहे की, ’द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या लोकांसाठी त्यांची ऑटो पूर्णपणे मोफत आहे. यासोबतच त्यांच्या ऑटोमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या दहा महिलांसाठी ते मोफत तिकीटही देणार असल्याचे नमूद केले आहे.

इस्लामिक कट्टरपंथीयांचे सत्य समोर आणणाऱ्या या चित्रपटामुळे हिंदू महिलांनी त्यांच्याविरुद्धचे षडयंत्र समजून घ्यावे असे मगर यांना वाटते. त्यामुळेच अधिकाधिक हिंदू महिलांनी हा चित्रपट पाहावा आणि इस्लामी कटांबद्दल जागरुक आणि सतर्क राहावे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी मोफत प्रवास घडवण्याची ऑफर दिली आहे.

साधू मगर यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर OpIndia ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणतात, ‘द केरळ स्टोरी'चा ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांनी चित्रपट पाहायला जाणाऱ्यांना मोफत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते हजारो हिंदू महिला 'लव्ह जिहाद'च्या बळी ठरल्या आहेत. म्हणूनच हिंदू महिलांनी या कटाबद्दल समजून घेऊन सतर्क राहावे असे त्यांना वाटते. यासाठीच हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते मोफत प्रवास घडवणार आहेत. (हेही वाचा: 'द केरळ स्टोरी' वरून वाद; चित्रपटातील दावे सिद्ध करणाऱ्याला मुस्लिम संघटनेकडून 1 कोटीचे बक्षीस जाहीर)

दरम्यान, साधू मगर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरातील रहिवासी आहेत. पूर्वी ते पुण्यातील एका कंपनीत कामाला होते. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांनी ऑटोरिक्षा विकत घेऊन हा व्यवसाय सुरू केला. पुण्यातील आळंदी आणि मरकळ भागात ते ऑटोरिक्षा चालवतात.