
मागच्या वर्षी बॉलीवूडच्या तीन तारका लग्नबंधनात अडकल्या होता. सोनम कपूर, दीपिका पदुकोन नंतर यावर्षी आता प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस (Wedding Anniversary) साजरा करत आहे. प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस (Nick Jonas) यांचे राजेशाही थाटातले लग्न 1 व 2 डिसेंबर 2018 रोजी पार पडले होते. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेस येथे 30 नोव्हेंबर रोजी मेहंदी आयोजित केली गेली होती. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी ख्रिश्चन विवाह झाला आणि 2 डिसेंबरला हिंदू विधीनुसार प्रियंका सप्तपदी चालली. आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रियंका व निक यांनी एकमेकांना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियंका व निक या दोघांनीही इंस्टाग्रामवर काही थ्रोबॅक फोटोज पोस्ट करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये प्रियंका म्हणते, ‘माझे वचन, तेव्हा..आज.. शेवटपर्यंत. तू नेहमीच माझ्या आयुष्यात आनंद, संतुलन, उत्साह, आवड आणलीस. मला शोधल्याबद्दल धन्यवाद .. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि प्रेम'. तसेच तिने पुढे या जोडप्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.
निकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपण एकमेकांसोबत कायम राहण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र फक्त हे पुरेसे नाही. प्रियंका, माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' (हेही वाचा: अभिनेत्री प्रियंका चोप्राला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाअगोदरचं मिळाली 'ही' गोड बातमी)
मागच्या वर्षी पार पडलेले प्रियंका आणि निक यांचे लग्न हा एक जागतिक सोहळ्याप्रमाणे होता. जगभरातून अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या. इतकेच नाही तर बुर्ज खलिफावर पुन्हा लग्न करण्यासाठी या दोघांना निमंत्रित करण्यात आले होते. या लागांतील कपडे, दागिने, व्हेन्यू, फोटो अशा सगळ्याच गोष्टींची मोठी चर्चा रंगली होती. लग्नानंतर दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी रिसेप्शन पार पडले होते, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते.