दक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) याचा बहुप्रतीक्षित आणि महत्त्वाकांक्षी अॅक्शन एंटरटेनर चित्रपट 'साहो' (Saaho) 30 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे श्रद्धा तेलुगू इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करत आहे. सुजितच्या दिग्दर्शनाखाली बनविला गेलेला साहो हा 2019 चा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. आता सर्वत्र चर्चा रंगली आहे ती प्रभासने या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची. मिळालेल्या माहितीनुसार प्रभासने या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
साहोसाठी घेतलेल्या या मानधनामुळे प्रभास हा भारतातील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे. रजनीकांत, सलमान खान आणि शाहरुख खान यांनाही प्रभासने मागे टाकले आहे. असेही बोलले जात आहे की, प्रभास साहोच्या रिलीजपूर्व व्यवसायातील 50 टक्के हिस्सा घेईल. मात्र, अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर साहोसाठी श्रद्धा कपूरला 7 कोटी मानधन दिले गेले असल्याची माहिती मिळत आहे. यासह श्रद्धाने सर्वाधिक मानधन मिळालेल्या भारतीय अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले आहे. यावर्षी श्रद्धाचे तीन चित्रपट बॅक टू बॅक रिलीज होत आहेत. यामध्ये साहो, छिछोरे, स्ट्रीट डान्सरचा समावेश आहे. (हेही वाचा: 'साहो' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज! प्रभास च्या रुपात लवकरच लाँच होणार 'Saaho The Game')
याआधी साहोची दोन गाणी आणि टीझर, ट्रेलर रिलीज झाले आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. सध्या 100 कोटी क्लबमध्ये एखादी फिल्म आली तर मोठ मोठ्या पार्ट्या झोडल्या जातात तिथे एका अभिनेत्याने एका फिल्मसाठी 100 कोटी मानधन घेतले आहे. दुसरीकडे जयललिता यांच्यावरील बयोपिकसाठी कंगना रनौतने 24 कोटी मानधन घेत बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रीचा मान मिळवला आहे.