प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D'Souza) सध्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. गाझियाबाद येथे राहणाऱ्या एका इसमाने रेमोच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. यामध्ये त्याने रेमोवर 5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, एका आगामी चित्रपटाच्या नावावर रेमोने आपल्याकडून 5 कोटी रुपये घेतले आहेत मात्र ते परत दिले नाहीत. आता या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. गाजियाबाद पोलिसांनी आता रेमोचा पासपोर्ट जप्त केला आहे. सत्येंद्र त्यागी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. ही घटना 2013 साली घडल्याचे सत्येंद्र यांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2013 साली एका आगामी चित्रपटाच्या नावावर रेमोने सत्येंद्र यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतले होते. 'अमर मस्ट डाय' (Amar Must Die) असे नाव असलेल्या या चित्रपटासाठी घेतलेल्या या रकमेच्या, दुप्पट पैसे करून देतो असे आश्वासन रेमो याने केले होते. परंतु चित्रपट प्रदर्शित होऊन 5 वर्षे झाली तरी, अद्याप त्याने ही रक्कम परत केली नसल्याचे त्यागी यांनी सांगितले आहे. सत्येंद्रचा आरोप आहे की जेव्हा त्याने रेमो डिसूझाकडे पैसे मागण्यास सुरवात केली, तेव्हा त्याला धमकावणे सुरू झाले. 13 डिसेंबर 2016 रोजी त्यागी यांना प्रसाद पुजारी नावाच्या व्यक्तीने धमकावले होते. (हेही वाचा: 5 कोटींच्या फसवणुकीविरोधात केलेल्या तक्रारीमुळे Remo D'souza अडचणीत; अजामीनपात्र वॉरंट केलं जारी)
पुजारीने आपला संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सत्येंद्र यांनी पुन्हा पैसे मागितले तर त्यांना ठार मारण्यात येईल अशी धमकीही त्यांना देण्यात आली. यानंतर सत्येंद्र त्यागी यांनी रेमो डिसूझाविरोधात सिहानीगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतरच्या सुनावणीदरम्यान अनेकवेळा रेमो न्यायालयात गैरहजर राहिला, म्हणून गाझियाबाद कोर्टाने रेमोच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. आता या प्रकरणाबाबत कारवाई करत रेमोचा पासपोर्ट जप करण्यात आला आहे.