Akshay Kumar with Narendra Modi (Photo Credits: File Photo)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) आई अरुणा भाटिया यांचे नुकतेच निधन झाले. त्याच्या आदल्या दिवशी आई आजारी असल्याचे समजतात अक्षय कुमार लंडनवरून परत आला होता. आपल्या कुटुंबासाठी हा अतिशय कठीण काळ असल्याचे अक्षय कुमारने म्हटले होते. आता या दुःखाच्या घडीला अभिनेत्याचे सांत्वन करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्याला एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी अक्षयच्या आईच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे. अक्षय कुमारने सोशल मिडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

त्याने पंतप्रधानांच्या या संदेशावर कृतज्ञता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने पंतप्रधानांना पाठवलेला संदेश शेअर करून त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांचे पत्र शेअर करत अक्षय कुमारने लिहिले, ‘माझ्या आईच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या दिवंगत आईबाबत आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांचे हे सांत्वनपर शब्द नेहमी माझ्या सोबत असतील. जय अंबे.’

पीएम मोदींनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे- ‘तुम्ही खूप मेहनत आणि संघर्षानंतर यशाची चव चाखली आहे. तुम्ही तुमच्या जिद्दीने आणि मेहनतीने स्वतःचे नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. तुमच्या प्रवासात तुम्ही योग्य मूल्ये आणि नैतिक बळ निर्माण केले आहे, ज्यातून तुम्ही संकटांना सहजपणे संधींमध्ये बदलू शकता आणि हा धडा तुमच्या पालकांकडून शिकला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा मला खात्री आहे की तुमची आई तुमच्या पाठीशी एखाद्या डोंगरासारकाही उभी राहिली असेल, जेणेकरून तुम्ही नेहमी दयाळू आणि नम्र राहाल.’ (हेही वाचा: सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासह एकूण 38 सेलेब्सविरोधात तक्रार दाखल; घडली मोठी चूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

दरम्यान, अक्षय काही काळापूर्वीपर्यंत राम सेतू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना, दुसरीकडे त्याने अतरंगी रे चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे. तो यामध्ये सारा अली खान आणि धनुष यांच्यासोबत दिसंर आहे. याशिवाय अक्षयचा सूर्यवंशीही रिलीजसाठी तयार आहे. या सर्व चित्रपटांबरोबर अक्षय कुमारकडे पृथ्वीराज, रक्षा बंधन आणि बच्चन पांडे देखील आहेत.