महाराष्ट्रात आता चित्रपटगृहे सुरू झाल्याने चित्रपट हे पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास वेग आला आहे. अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात येत आहे, जो या वर्षातील एका बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजेच येणाऱ्या या ऑक्टोबरमधील शेवटच्या शुक्रवारी ओटीटीवर अनेक धमाकेदार वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, झी 5 या OTT प्लॅटफॉर्मवर 29 ऑक्टोबर रोजी अनेक बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यांची यादी पुढीलप्रमाणे-
आफत ए इश्क (झी 5)
झी स्टुडिओज निर्मित, आफत-ए-इश्क ही लल्लोची आणि तिच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची कथा आहे. हा चित्रपट एक डार्क ड्रामा कॉमेडी आहे. आफत-ए-इश्कचे दिग्दर्शन इंद्रजित नट्टोजी यांनी केले आहे. नेहा शर्मासोबत, दीपक डोबरियाल, अमित सियाल, नमित दास आणि इला अरुण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'अफत-ए-इश्क' 29 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हम दो हमारे दो (डिस्ने हॉटस्टार)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हम दो हमारे दो' चित्रपटाची कथा एका विवाहित जोडप्यावर बेतलेली आहे. या जोडप्याला चक्क आई-वडील दत्तक घ्यायचे असतात. हा एक कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा चित्रपट असेल. निर्मात्यांना आशा आहे की ही अनोखी कल्पना लोकांना चित्रपटाकडे आकर्षित करेल. राजकुमार आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त, रत्ना पाठक शाह आणि परेश रावल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. 29 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
'डायबुक' (अमेझॉन प्राइम व्हिडिओ)
इमरान हाश्मी स्टारर हॉरर थ्रिलर 'डायबुक'ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. डायबुक हा सुपरहिट मल्याळम चित्रपट 'एजरा' (2017) चा अधिकृत रिमेक आहे. ज्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. जय कृष्णन यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. 29 ऑक्टोबरलाला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
कॉल माय एजंट' (नेटफ्लिक्स) -
शाद अली दिग्दर्शित 'कॉल माय एजंट' ही वेब सिरीज असून ती 29 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. ही वेब सिरीज फ्रेंच भाषेतील कॉमेडी-ड्रामा सिरीज 'डिक्स पोर सेंट' वरून प्रेरित आहे. या नेटफ्लिक्स शोमध्ये रजत कपूर, सोनी राझदान, दिया मिर्झा, आहाना कुमरा आणि आयुष मेहरा यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. (हेही वाचा: Vicky Kaushal आणि Katrina Kaif डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ? माध्यमांमधील बातम्यांवर अभिनेत्रीने सोडले मौन, म्हणाली...)
मॅराडोना: ब्लेस्ड ड्रीम (अमेझॉन प्राइम व्हिडिओ) -
मॅराडोना: ब्लेस्ड ड्रीम (Maradona: Blessed Dream) ही स्पोर्ट्स ड्रामा सिरीज, फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोनाचा बायोपिक आहे. 29 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तो प्रदर्शित होत आहे. अलेजांद्रो आयमेटा दिग्दर्शित मॅराडोना ही मूळची स्पॅनिश मालिका असून ती आता इंग्रजीत प्रदर्शित होत आहे.