कोरोना विषाणूचा (Coronavirus) चित्रपटगृह (Multiplex), थिएटर व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सिनेमागृह जवळपास 7 महिने बंद राहिले होते व कुठे त्यांना उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अजूनही कोरोनाचे सावट टळले नसल्याने लोक चित्रपटगृहांविषयी उत्साही नाहीत. अशा परिस्थितीत थिएटर मालक लोकांना थिएटरमध्ये घेऊन येण्यासाठी विविध शकला लढवत आहेत. आता यासाठी लोकप्रिय चित्रपट निर्माता कंपनी यश राज फिल्म्सने (Yash Raj Films) पीव्हीआर (PVR Cinemas), आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलिस (Cinepolis) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. या सर्व चेन एकत्र आल्या असून, या दिवाळीत यशराज फिल्म्सने कंपनीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जुने चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाउननंतर अनलॉकिंग प्रक्रिया सुरू झाली आणि 15 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशभरात सिनेमा हॉल सुरू करण्याची परवानगी दिली गेली. 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात सिनेमाहॉल्स खुली झाली आहेत. परंतु त्यानंतरही सिनेमा हॉल रिकामेच असलेले दिसत आहेत. सध्या तरी एकही नवा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी तयार नाही. म्हणूनच आता यश राज फिल्म्स त्यांचे 'वीर झारा', 'सुलतान', 'मर्दानी', 'रब ने बना दी जोडी', 'एक था टायगर', 'जब तक है जान', 'बॅन्ड बाजा बारात', 'कभी कभी', 'सिलसिला' यांसारखे सुपरहिट चित्रपट विना शुल्क दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी प्रेक्षकांना फक्त 50 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे.
This Diwali, enjoy watching the biggest blockbusters on the big screen once again with YRF 50 Big Screen Celebrations across @_PVRCinemas, @INOXMovies and @IndiaCinepolis #YRF50 pic.twitter.com/rlzusEDbdY
— Yash Raj Films (@yrf) November 9, 2020
हे चित्रपट 12 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत पीव्हीआर, आयएनओएक्स, सिनेपॉलमधील चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहेत. अशाप्रकारे यशराज फिल्म्सने मल्टिप्लेक्सला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. वायआरएफ कोणत्याही शुल्काविना सिनेमागृहांना आपले चित्रपट चालवू देणार आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर चित्रपट गृहांनी याचे तिकीट 50 रुपये निश्चित केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक निर्मात्यांनी चित्रपटगृहांच्या ऐवजी ओटीटीवर थेट चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. शुजित सरकारचा ‘गुलाबो सीताबो’, त्यानंतर 'शकुंतला देवी', 'दिल बेचरा', 'खाली पिली' असे अनेक चित्रपट थेट ओटीटीवर आले. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे सिनेमाहॉल्सच्या मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता यशराज फिल्म्स त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.