Kangana Ranaut and Rangoli Chandel (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. चौकशीसाठी 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलिस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी देखील कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी समन्स बाजवला होता. मात्र त्याचे उत्तर दोघींकडूनही देण्यात आले नव्हते. (कंगना रनौत ने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांना केले ट्रोल, म्हणाली 1 वर्ष सुद्धा टिकणार नाही)

कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर वांद्रे कोर्टाने कंगना आणि रंगोली विरोधात एफआयआर दाखल करुन पोलिसांनी पुढील कारवाई करणयाचे आदेश दिले आहेत. यापूर्वी देखील मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली विरोधात समन्स जारी केला होता. यात दोन्हींना 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध वांद्रे पोलिस स्टेशन (मुंबई) येथे 124 ए (देशद्रोह), 295 ए आणि 153 ए या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कंगनाने बॉलिवूड आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तसंच कंगनाने आपल्या ट्विट्समधून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून ती शिक्षेसाठी पात्र आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कंगना रनौत हिने बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने मांडला. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक मुद्दांवर बेधडक भाष्य केले. यावरच ती थांबली नाही तर सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन रंगलेल्या राजकारणात तिने उडी घेतली आणि मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली. दरम्यान, तिच्या टीकात्मक ट्विट्सची मालिका थांबवण्याचे नाव घेत नव्हती. या ट्विटमधून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्यावर करण्यात आला आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.