प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

New Guidelines for Cinema Halls: चित्रपटगृहात चित्रपट पाहणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने सिनेमा आणि मल्टिप्लेक्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, 100 टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे सांगितले आहे की, सरकारने सिनेमाहोल, थिएटर आणि मल्टिप्लेक्सच्या मालकांना 100 टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना चित्रपट दाखविण्याची परवानगी दिली आहे.

मात्र, सिनेमागृहांना केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं बंधनकारक असणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल. यापूर्वी केंद्र सरकार थिएटरमधील जागांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त करण्यास परवानगी देण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त होते. 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, देशभरातील थिएटर बंद करण्यात आले. 15 ऑक्टोबरपासून सशर्त चित्रपटगृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. (वाचा - Priyanka Chopra Instagram Post Cost: इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा किती मानधन घेते? आकडा पाहून सर्वांचीच उडेल झोप)

यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती, जी थिएटरांना पूर्ण करावी लागली. या मार्गदर्शक सूचनांनुसार थिएटरांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के जागा बुक कराव्या लागल्या. परंतु, नव्या परिस्थितीत सरकारने ही संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर गृहमंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, संक्रमण क्षेत्राबाहेरील सर्व सिनेमागृहांना परवानगी देण्यात येईल. मात्र, यास एसओपी (मानक कार्यप्रणाली) अनुसरण करणे आवश्यक आहे.

नवीन एसओपीनुसार, सर्व चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्समध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल. थिएटरमध्ये प्रवेश करणार्‍या लोकांना मास्क लावणे अनिवार्य असेल. सिनेमाहोलच्या कॉमन एरिया, एंट्री आणि एग्जिट प्वाइंट्सवर लोकांना सॅनिटाइज करणे अनिवार्य असेल. सिनेगृह परिसरात थुंकणे कठोरपणे प्रतिबंधित असेल. चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या लोकांसाठी मोबाईलमध्ये आरोग्य सेतु अॅप असणेही बंधनकारक असेल. 1 फेब्रुवारीपासून देशातील सर्व थिएटरमध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील.

सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीला नक्कीच चालना मिळेल. मागील वर्षी, कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे देशभरातील थिएटर सुमारे सात महिने पूर्णपणे बंद होते. 15 ऑक्टोबर रोजी सिनेमागृह सुरू झाल्यानंतर कमी बजेटचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सुरूवात झाली. मात्र, बिग बजेटचे चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेले नाहीत.