राणी मुखर्जीच्या 'Mardaani 2' वरून नवीन वादाला सुरुवात; चित्रपटाचा निषेध करत बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या कारण
Mardaani 2 First Look (Photo Credits-Twitter)

राणी मुखर्जीची (Rani Mukherjee) पुनरागमन फिल्म म्हणून 'मर्दानी'कडे पहिले जाते. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता राणी 'मर्दानी 2' (Mardaani 2) च्याद्वारे चाहत्यांच्या भेटीला येत आहे. यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी 2’ चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच त्याला विरोधही व्हायला सुरुवात झाली आहे. कोटा शहरातील अनेक व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांनी राणी मुखर्जीच्या या चित्रपटाच्या आशयाचा निषेध करत, त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रपटाद्वारे कोटा शहराची वाईट प्रतिमा दर्शविण्याचा प्रयत्न होता असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

मर्दानी 2 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोटा शहराला 'कोचिंग सिटी' म्हणून दर्शवले आहे. देशभरातून इथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, चित्रपटात या शहरात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर भाष्य केले आहे.  त्यामुळे इथल्या लोकांचे म्हणणे आहे की, या काल्पनिक कथेमध्ये कोटाचे नाव घेतले जाऊ नये. या चित्रपटामुळे कोटाचे नाव बदनाम होईल आणि म्हणून चित्रपटा मधून शहराचे नाव काढून टाकले पाहिजे. या चित्रपटाचे बरेचसे शूटिंगही कोटामध्ये झाले आहे. (हेही वाचा: Mardaani 2 Official Trailer: सत्य घटनेवर आधारित असा अंगावर काटा आणणारा ‘मर्दानी 2’ चित्रपटाचा ट्रेलर, Watch Video)

मर्दानी 2 चित्रपटाच्या निषेधार्थ अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी कोटा येथे दाखल झालेल्या, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना निवेदन दिले. त्याद्वारे चित्रपटावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, 'कोटा शहराबाबत मर्दानी 2 या चित्रपटात काही गंभीर टिप्पण्या केल्या गेल्या असल्याचे मला काही संघटनांकडून सांगण्यात आले आहे. मी नक्कीच यावर विचार आणि चर्चा करेन. कोणालाही चित्रपटांद्वारे कोणत्याही शहराची बदनामी करण्याचा अधिकार नाही. चित्रपटात जी घटना दाखवली गेली आहे ती काल्पनिक आहे. एका काल्पनिक घटनेत शहराचे नाव घेणे ही बाब गंभीर आहे आणि त्यासाठी निश्चितच कारवाई केली जाईल.’