नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबतच्या बातम्या खोट्या; विवान शाह यांचा ट्वीटरच्या माध्यमातून खुलासा
नसीरुद्दीन शाह (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता नसिरूद्दीन शाह यांची प्रकृती बिघडल्याच्या अनेक बातम्या झपाट्याने सोशल मीडियामध्ये पसरत आहेत. मात्र या फेक न्यूज असल्याची माहिती शाह कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान मागील काही तासांमध्ये अभिनेता नसिरूद्दीन शाह आजारी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशा आशयाचे वृत्त झपाट्याने फिरत असल्याने त्यांच्या फॅन्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काही वेळातच त्यांचे बंधू जमीरउद्दीन शाह (Zameer Uddin Shah)आणि मुलगा विवान शाह यांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

जमीरउद्दीन शाह यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले आहे की ' नसिरूद्दीन हे ठीक असून काही विघ्नसंतोषी लोकं अशाप्रकारच्या चूकीच्या बातम्या पसरवत आहेत. मी त्यांच्याशी रोज बोलतोय त्यांची प्रकृती उत्तम आहे. पण या बातम्या नुकसानकारक आहेत.'

नसीरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शाह चं ट्वीट

विवानने ट्वीट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सारं ठीक आहे. बाबा व्यवस्थित आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत दिल्या जाणार्‍या बातम्या खोट्या आहेत. इरफान खान आणि चिंटू जी (ऋषि कपूर) यांची त्यांना आठवण येत आहे. त्यांचं नुकसान भरून न येणारं आहे. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत असं म्हटलं आहे.