अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) यांनी केलेल्या विनयभंग प्रकरणात ओशिवारा पोलिसांनी (Oshiwara Police ) अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांना क्लिन चिट दिली. त्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. नाना पाटेकर यांना क्लिन चिट मिळणे म्हणजे भ्रष्ट पोलिसांनी भ्रष्ट नानाला क्लिन चिट दिल्याचे तनुश्री दत्ता यांनी म्हटले आहे. नाना पाटेकर यांनी चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच महिलांना धमकी दिली आहे. तसेच, धमकी देत त्यांनी त्यांचा छळही केल्याचा आरोप तनुश्री दत्ता यांनी पुन्हा एकदा केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करुन तनुश्री दत्ता यांची प्रतिक्रिया दिली आहे.
ओशिवारा पोलिसांनी (Oshiwara Police ) अंधेरी न्यायालयाला सादर अहवालात नाना पाटेकर यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विनयभंग प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांना मोठा दिलासा. तर, हे आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ता यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. दरम्यान, या अहवालावर नाना पाटेकर अथवा तनुश्री दत्ता यांच्याकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, एएनआय वृत्तसंस्थेच्या माध्यमातून आता तनुश्री दत्ता यांची प्रतिक्रिया पुढे आली आहे. (हेही वाचा, मुंबई: तनुश्री दत्ता विनयभंग प्रकरणात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नाहीत: ओशिवारा पोलीस)
एएनआय ट्विट
Tanushee Dutta statement: A corrupt police force & legal system giving a clean chit to an even more corrupt person Nana who has been accused even in the past of bullying,intimidation and harassment by several women in the film Industry. https://t.co/p2zNNTn50I
— ANI (@ANI) June 13, 2019
दरम्यान, तनुश्री दत्ता हिने 2018मध्ये #MeToo मोहिमेखाली आरोप केले होते की, अभिनेता नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिच्यावर सेक्शुअली हॅरॅशमेंट केली. त्यानंतर या आरोपांची इतकी चर्चा झाली की, थेट नाना पाटेकर यांनाही प्रश्न विचारण्यात आले. या आरपांमध्ये गणेश आचार्य यांनाही ओढत तनुश्रीने म्हटले होते की, नानाने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना सांगून गाण्यात जाणीवपूर्वक इंटीमेट स्टेप्स ठेवल्या होत्या. या प्रकाराला विरोध केल्यावर नाना पाटेकर यांनी तिला धमकी देण्यासाठी सेटवर गुंड बोलावले होते, असाही आरोप तनुश्रीने केला होता.
काय आहे प्रकरण?
झूम टीव्हीसाठी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या गैरवर्तवणूकीचा उल्लेख केला होता. 2008 साली तनुश्री दत्ताला ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटामध्ये कास्ट करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच नानांचे वागणे तनुश्रीसोबत ठीक नव्हते. चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्रीशी अनेक वेळा असभ्य वर्तन केले. नानांनी तनुश्रीच्या हाताला पकडणे, तिला खेचणे असे प्रकार सुरु केले होते. याबाबत तनुश्रीने निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांकडेही तक्रार केली होती मात्र, दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नानांनी एका गाण्यामध्ये तनुश्रीसोबत इंटीमेट सीन करण्याची मागणी केली. करारानुसार ते गाणे फक्त तनुश्रीवर चित्रित करण्यात येणार होते. मात्र तरीही नाना पाटेकर यांना त्या गाण्यामध्ये तनुश्रीसोबत डान्स करायचा होता.
नाना पाटेकर यांच्यावर काय आहेत आरोप?
असभ्य वर्तन, मुद्दाम जवळीक साधण्याचा प्रयत्न, मारहाणीचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर आरोप, तनुश्री दत्ताने एकूण 4 लोकांवर लावले आहेत. या चारही व्यक्ती बॉलिवूडमधील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्यापैकी एक नाव आहे नाना पाटेकर यांचे. नाना पाटेकर यांच्यासोबतच सामी सिद्दकी, राकेश सारंग, गणेश आचार्य हे त्या कृत्यात सामील होते असे तनुश्रीचे म्हणणे आहे.