Manikarnika Returns: The Legend of Didda! अभिनेत्री कंगना रनौतने केली 'मणिकर्णिका रिटर्न्स'ची घोषणा; साकारणार कश्मीरच्या 'रानी दिद्दा'ची भूमिका
कंगना रानौत Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. पंगा, क्वीन, मणिकर्णिका यांसारख्या बर्‍याच चित्रपटांत तिची खास स्टाईल पाहायला मिळाली होती. कंगना काही काळापासून सोशल मीडियावरही बरीच सक्रीय झाली आहे. यादरम्यान अनेक सेलेब्रिटी आणि राजकारण्यांशी तिच्या वादाच्या बातम्या समोर येत होत्या. आता कंगना एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कंगना रनौतने तिचा नवीन चित्रपट 'मणिकर्णिका रिटर्न्स’ची घोषणा केली आहे. कंगनाने ट्विटरद्वारे सांगितले की, तिचा पुढचा चित्रपट 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा’ (Manikarnika Returns: The Legend of Didda) असणार आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे- 'आमचा भारतवर्ष झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांचा साक्षीदार आहे. अशीच आणखी एक अनोखी वीरगाथा आहे कश्मीरच्या राणीची, जिने महमूद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. कमल जैन आणि मी घेऊन येत आहोत, ‘मणिकर्णिका रिटर्न्स: द लेजेंड ऑफ दिद्दा’ कंगनाच्या 2019 च्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा हा सिक्वल आहे. पहिल्या भागात कंगना राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसली होती.

चित्रपटातील मुख्य पात्र रानी दिद्दाचे आहे, जी काश्मीरची पहिली महिला शासक होती. दहाव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत तिने काश्मीरवर सुमारे पाच दशके राज्य केले. एक पाय पोलिओग्रस्त असूनही, ती एक महान योद्धा ठरली होती. कंगना जानेवारी 2022 पासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकते. कंगना आणि कमल जैन यांनी 'मणिकर्णिका' च्या पहिल्या भागात एकत्र काम केले होते. हा सिक्वलदेखील पहिल्या भागासारखा भव्य स्तरावर बनविला जाईल. (हेही वाचा: विजय सेतूपती च्या 'मास्टर' चित्रपटातील सीन्स रिलीज होण्यापूर्वीचं इंटरनेटवर लिक; पायरसीमुळे नाराज झाले निर्माते)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना तिचा आगामी चित्रपट 'थलाईवीमध्ये' तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती तिच्या ‘धकड’ या दुसर्‍या चित्रपटावरही काम करत आहे.