यंदाचा जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल (Jio MAMI Mumbai Film Festival 2021-22) रद्द करण्यात आला आहे. हा चित्रपट महोत्सव देशातील एक प्रतिष्ठित महोत्सव समजला जातो. महोत्सवाचे 2021 एडीशन कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आले होते आणि हा महोत्सव 2022 च्या मार्चमध्ये होणार होता, परंतु आता हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. हा महोत्सव मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) द्वारे आयोजित केला जातो, ज्याची संकल्पना आणि निर्मिती सर्व स्तरातील चित्रपट प्रेमींना गुंतवून ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.
आता हा महोत्सव रद्द केल्याचा थेट परिणाम स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांवर झाला आहे, ज्यांच्यासाठी हा चित्रपट महोत्सव खूप महत्वाचा आहे. आपले काम, आपली निर्मिती सादर करण्याचे हे खूप मोठे व्यासपीठ आहे. शुक्रवारी सहभागी चित्रपट निर्मात्यांना पाठवलेल्या पत्रात, कार्यक्रम आयोजकांनी महोत्सव रद्द करण्याची कारणे नमूद केली. यामध्ये लॉजिस्टिक आणि आर्थिक आव्हाने उद्धृत केली आहेत. अशा आव्हानांमुळे मार्चमध्ये महोत्सव आयोजित करणे त्यांच्यासाठी अशक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
महोत्सवाच्या आयोजकांनी शनिवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ते त्यांच्या डिजिटल स्क्रीनिंग प्लॅटफॉर्मवर (Shift72) चित्रपट प्रदर्शित करणे सुरू ठेवणार आहेत. कोविड-19 महामारीमुळे मुंबई चित्रपट महोत्सवाचे 2020 एडिशन रद्द करण्यात आले होते, तसेच कोरोना व्हायरस व्हेरिएंटमुळे 2021 एडिशन मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. मुकेश अंबानींच्या समूहाची दूरसंचार कंपनी ‘जिओ’ हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. (हेही वाचा: प्रभास आणि पूजा हेगडेचा 'Radhe Shyam' चित्रपट OTT वरही पाहता येणार; तब्बल 250 कोटींना झाली डील- Reports)
नीता अंबानी या मामीच्या विश्वस्त मंडळाच्या सह-अध्यक्ष आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानी, महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा, पीव्हीआर सिनेमाचे चेअरपर्सन अजय बिजली, झोया अख्तर, विक्रमादित्य मोटवाने आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासह अनेक चित्रपट निर्माते या महोत्सवाचे विश्वस्त आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये, प्रियांका चोप्रा जोनासची दीपिका पदुकोणच्या जागी मामीची चेअरपर्सन म्हणून निवड केली गेली.