अभिनेत्री मालविका मोहनन (Malavika Mohanan) तिच्या आगामी 'युध्र' (Yudhra) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) याच्यासोबत दिसणार आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका खास मुलाखतीदरम्यान नुकताच तिने हा खुलासा केला. Excel Entertainment द्वारे निर्मित हा चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. आगामी 'युध्र' चित्रपटात ती पूर्णपणे नव्या भूमिकेत असेल आणि तिचा हा चित्रपट काही काळापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'थंगालन' पेक्षा पूर्णपणे वेगळा असेल, असेही तिने जोर देऊन सांगितले.
'युध्र' चित्रपट पुढील महिन्यात प्रसारित
अभिनेत्री मालविका मोहनन हिने 'News18' दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी सिद्धांत चतुर्वेदीसोबत केलेला चित्रपट एक्सेल एंटरटेनमेंटने निर्मित केला आहे. तो पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. आम्ही काही दिवसातच ट्रेलर प्रदर्शित करू. 'थंगालन'च्या तुलनेत, हा चित्रपट पूर्णपणे वेगळा असेल. हा एक वेगळा उपक्रम असल्याने मी स्वत:ही चित्रपटाबाबत अतिशय उत्सुक आहे. 'थंगालन' आणि 'युद्ध्रा' या दोन्ही चित्रपटातील भूमिका या परस्परांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. त्या इतक्या वेगळ्या आहेत की, एका अभिनेत्याला अनेक अष्टपैलू चित्रपटांचा भाग बनवून टाकतात. मला आशा आहे की, हा चित्रपट इतरही अनेक निर्माते पाहतील आणि मला वेगवेगळ्या भूमिकांसाठी संधी देतील, असेही मालविका हिने म्हटले. (हेही वाचा, Yudhra Poster: आगामी 'युधरा' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, मालविका मोहननची स्टाईल पाहून चाहते फिदा)
दरम्यान, मालविका मोहनन हिने तिच्या चित्रपटातील कामाव्यतिरिक्त, अलीकडेच वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) येथे प्रमुख पाहुणे सहभाग नोंदवला. या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने सोशल मीडियावर कार्यक्रमाची छायाचित्रे पोस्ट केली. या उपस्थितीबद्दल सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, “वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे हा अत्यंत सन्मान होता. लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, कमांडंट डीएसएससी आणि संपूर्ण टीमसोबत माझा अनुभव अविस्मरणीय बनवल्याबद्दल धन्यवाद! भारतीय लष्कराच्या आदरातिथ्याबद्दल जे सांगितले जाते ते अगदी ते खरे आहे.”
मालविका मोहननने 2013 मध्ये मल्याळम चित्रपट 'पट्टम पोल' द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ज्यामध्ये दुल्कर सलमान सह-कलाकार होता. त्यानंतर ती 'निर्नायकम', 'द ग्रेट फादर' आणि 'क्रिस्टी' यांसह अनेक उल्लेखनीय मल्याळम चित्रपटांमध्ये दिसली आहे. याव्यतिरिक्त, तिने माजिद माजिदीच्या 'बियॉन्ड द क्लाउड्स' मधील इशान खट्टरच्या भूमिकेसाठी लक्ष वेधून घेतले. तिच्या आगामी चित्रपटास प्रेक्षक आणि तिच्या चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे.