Madhuri Dixit (Photo Credits: File Image)

बॉलिवूडची डान्स क्विन माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचा आज 53 वा वाढदिवस. निखळ सौंदर्य, मनमोहक हास्य, अप्रतिम अभिनय आणि नृत्याची अदाकारी यामुळे माधुरी दीक्षित हिने गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे. तिच्या लोभस व्यक्तिमत्त्वाची भूरळ प्रेक्षकांना पडली नसेल तर नवलच. अगदी लहानपणापासूनच तिने शास्त्रिय नृत्य कथ्थकचे धडे गिरवायला सुरुवात केली. सिनेसृष्टीत येण्याचे तिच्या मनातही नव्हते. मात्र नृत्य आणि अभिनय याच्या आवडीने तिला सिनेसृष्टीत येण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच पुढे तिच्या यशस्वी कारर्दीला सुरुवात झाली. 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या 'अबोध' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. परंतु, 'तेजाब' सिनेमाने माधुरीला ओळख, प्रसिद्धी मिळवून दिली. या सिनेमासाठी तिला फिल्मफेयरचे सर्वोकृष्ट अभिनेत्रीचे नॉमिनेशनही मिळाले होते. तर आजही 'तेजाब' मधील 'एक, दो, तीन...' हे गाणे ठेका धरायला भाग पाडते. त्याचबरोबर माधुरीची अनेक गाणी आणि त्यातील तिचे नृत्य आजही चाहत्यांना भूरळ पाडते.

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त पाहुया 'तेजाब', 'देवदास,' 'पुकार,' 'हम आपके है कौन' आणि 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातील तिच्या सुपरहिट गाण्यांची झलक. या गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले असून यातील तिचे नृत्य, अदाकारी नक्कीच रिफ्रेशिंग आहे. ('तबाह हो गए' गाण्यातील माधुरी दीक्षित हिचा बहारदार डान्स आणि दिलखेचक अदा प्रेक्षकांचे मन जिंकेल)

एक दो तीन (तेजाब)

दीदी तेरा देवर दीवाना (हम आपके है कौन)

के सरा सरा (पुकार)

डोला ला रे... (देवदास)

घाघरा (ये जवानी है दीवानी)

'तेजाब' नंतर 'राम लखन', 'परिंदा', 'त्रिदेव', 'किशन कन्हैया', 'बेटा', 'प्रहार' यांसारख्या यशस्वी सिनेमांची रांगच लागली. आमिर खान सोबतच्या 'दिल' सिनेमाने तिला फिल्मफेयरचा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून दिला. तर 'हम आपके है कौन' या सिनेमामुळे माधुरी प्रत्येक घराची लाडकी 'निशा' झाली. आपल्या कलेने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या आणि अजूनही करत असणाऱ्या माधुरी दीक्षितला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!