लखनऊ येथे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा; पोलिसांकडून गुन्हा दाखल
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. लखनऊ मधील या घोटाळ्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लखनऊच्या (Lucknow) हजरतगंज (Hazratganj) येथे किरण बाबा नामक व्यक्तीने स्वतःला एयोसिस स्पा एन्ड वेलनेस कंपनीचे एमडी असल्याचे सांगून मिदा सदीप इंटरप्रायजेजच्या संचालकाकडून गुंतवणूकीच्या नावाखाली पैसे घेतले होते. त्यावेळेस किरण बाबा यांनी खोटी माहिती देऊन शिल्पा शेट्टी त्यांच्या कंपनीची ब्रँड एम्बासेडर (Brand Ambassador) आहे, असे सांगितले होते. (शिल्पा शेट्टी हिने Surrogacy चा पर्याय निवडण्यामागचं सांगितलं कारण; वाचा मातृत्व मिळवण्याची 'ती'ची कहाणी)

आज तकच्या रिपोर्टनुसार, किरण बाबा या व्यक्तीने शिल्पा शेट्टी हिचा फोटो दाखवून कंपनीची जाहिरात केली होती. तसंच त्याच्या फ्रँचाइजीसाठी अभिनेत्री वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदाराने पैसे पुढे केले होते. मात्र त्यानंतर सातत्याने होत असलेला तोटा पाहता किरण बाबा या व्यक्ती आणि कंपनीबद्दल अधिक तपास करण्यात आला. त्यानंतर फसवणूक करुन ही व्यक्ती पैसे उकाळत असल्याचे समोर आले. फ्रँचाइजीच्या नावाखाली करण्यात आलेल्या फसवणूकीमुळे या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक किरण बाबा आणि डिरेक्टर विनय भसीन समवेत इतर स्टाफ विरोधात हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर आयपीसी कलम 408, 420 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हजरतगंज चे एसपी अभय मिश्रा यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, एयोसिस स्पा एन्ड वेलनेस कंपनीच्या मालकांसमवेत इतर कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.