महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी लता मंगेशकर आणि आमिर खान यांची मदत; मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केली रक्कम
Aamir Khan and Lata Mangeshkar (Photo Credits: Getty Images)

महाराष्ट्रातील पूर (Flood) ओसरल्यावर आता कुठे जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे ते पाहता हा प्रदेश पुन्हा वसवण्यासाठी मदत आणि वेळ या दोहोंची गरज भासणार आहे. यासाठी आता मुख्यमंत्री मदत निधीसाठी (Maharashtra Flood Relief Fund) भारताची गानकोकिळा गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) यांनी अनुक्रमे 11 लाख आणि 25 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मदतीबद्दल दोघांचेही आभार मानले आहेत. महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली, सातारा अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपूर्वी पूरस्थिती उद्भवली होती. तब्बल एक आठवडा पुराने थैमान घातले होते. जेव्हा हळूहळू पूर ओसरायला लागला तेव्हा पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला. सामान्य नागरिक, देवस्थाने, शैक्षणिक संस्था, चित्रपटसृष्टीमधील अनेक मंडळींनी मदतीचा हात पुढे केला होता. यामध्ये आता लता मंगेशकर आणि अमीर खान यांची भर पडली आहे. (हेही वाचा: पूरग्रस्तांच्या घरांची प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुनर्बांधणी, शेतकऱ्यांचे 1 हेक्टरवरील नुकसानावरचं कर्ज माफ करणार: मुख्यमंत्री फडणवीस)

दरम्यान, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती होती. या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 54 वर पोहचली आहे. 8,000 पेक्षा जास्त जनावरे ठार झाले व एकूण 19,702 घरे नष्ट झाली आहेत. ही आकडेवारी पाहता पुरामुळे किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो. या जलप्रलयाचा सर्वात जास्त फटका बसला तो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना. सांगलीमध्ये तर पुराने 2005 सालचा रेकॉर्ड मोडला होता. दुसरीकडे कोल्हापूरच्या चहूबाजूंनी पाण्याचा वेढा होता. अशा परिस्थिती अनेक गावे पाण्याखाली गेली होती. आता या नागरिकांच्या पुनर्वसनाचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे.