आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाला आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. आमिरचा हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बॉयकॉट केला गेला, यासह आमिरच्या अभिनयातील तोचतोचपणा लोकांना चित्रपटगृहापासून लांब ठेवण्यासाठी कारणीभूत ठरला. आमिरने या चित्रपटासाठी अनेक वर्षांचा काळ दिला होता, अशा परिस्थितीत आमिरची निराशा होणे साहजिक आहे. आता आमिर दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन अमेरिकेला जाणार असल्याची नवीन बातमी समोर आली आहे.
एका वृत्तानुसार, नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करण्यापूर्वी आमिर स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करू इच्छितो, त्यासाठी तो स्वतःला 2 महिन्यांचा वेळ देणार आहे. 'लाल सिंग चड्ढा'ला मिळालेल्या मंद प्रतिसादामुळे आमिर खचून गेला आहे. आता अशा वातावरणात त्याने दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचाही तो विचार करत आहे.
आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडचा हिट चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक आहे. यात आमिर, करीना कपूरशिवाय साऊथ स्टार नागा चैतन्यनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत चित्रपटाला दोन आठवड्यात केवळ 56 कोटी जमा करण्यात यश आले आहे. (हेही वाचा: चित्रपटाला नामांकन दिल्याने कंगना रणौत ठोकणार फिल्मफेअरवर दावा; म्हणाली- 'हे माझ्या प्रतिष्ठेच्या, कामाच्या नीतीच्या विरुद्ध')
आमिर खानच्या पुढील चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक स्पोर्ट्स ड्रामा असेल, ज्याचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना करणार आहेत. याआधी त्यांनी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' बनवला होता. 2018 मध्ये आलेल्या 'कॅम्पिओन' या स्पॅनिश चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पॅनिश चित्रपटाला त्या वर्षी ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते आणि तो देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.