बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांमध्ये चर्चेचा विषय असते. कधी आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळे, तर कधी आपल्या चित्रपटांमुळे कंगना नेहमीच लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असते. आताही असेच काहीसे घडले आहे. कंगनाने फिल्मफेअरवर (Filmfare Awards) दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फिल्मफेअरवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली असून, तिने त्यामागचे कारणही सांगितले आहे.
67 व्या फिल्मफेअर पुरस्कार 2022 साठी नामांकन यादी जाहीर झाली आहे. यामध्ये, रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष श्रेणीमध्ये '83' चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे, तर कंगनाला 'थलायवी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महिला श्रेणीत नामांकन मिळाले आहे. याचाच कंगनाला राग आला आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार, फिल्मफेअरने तिला एका पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. त्यामुळेच तिने ही केस करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही विचार कराल की पुरस्कारासाठी नामांकन झाल्यानंतर कोण का असा निर्णय घेईल?
आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाने सांगितले की, तिने 2014 पासून फिल्मफेअरवर बंदी घातली आहे. ती म्हणते, ‘मी 2014 पासून फिल्मफेअरसारख्या भ्रष्ट आणि पूर्णपणे अन्यायकारक प्रथांपासून दूर आहे, पण मला यावर्षी त्यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक कॉल येत आहेत. त्यांना मला 'थलायवी'साठी पुरस्कार द्यायचा आहे. ते अजूनही मला नामांकन देत आहेत हे जाणून मला थोडे आश्चर्य वाटले. पण, अशा भ्रष्ट व्यवहारांना कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन देणे हे माझ्या प्रतिष्ठेच्या, कामाच्या नीतीच्या विरुद्ध आहे, म्हणून मी फिल्मफेअरवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.’ (हेही वाचा: फिल्मफेअरमध्ये 'शेरशाह', '83', 'सरदार उधम' आणि 'रश्मी रॉकेट'चे वर्चस्व; जाणून घ्या किती श्रेणींमध्ये मिळाले नामांकन)
दरम्यान, कंगना राणौतच्या नावावर चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आता अभिनेत्री 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत महिमा चौधरी आणि अनुपम खेरसारखे स्टार्सही दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे कंगना पुन्हा एकदा दिग्दर्शनात उतरणार आहे. हा चित्रपट आणीबाणीवर आधारीत असून, यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.