बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir khan) सध्या तुर्कीमध्ये आपला आगामी चित्रपट लाल सिंह चढ्ढा (Laal Singh Chaddha) चे शुटींग करत आहे. अशात 15 ऑगस्ट रोजी आमिर खानने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान (Recep Tayyip Erdogan) यांची पत्नी आणि देशातील पहिली महिला (First Lady) एमीन एर्दोगान (Emine Erdogan) यांची भेट घेतली. इस्तंबूलमधील प्रेसिडेन्शिअल पॅलेस ह्युबर मॅन्शन (Huber Mansion) मध्ये एमीनने आमिर खानचे स्वागत केले. एमीन एर्दोगान यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
तुर्कीची सरकारी वृत्तसंस्था अनाडोलू यांनी सांगितले की, आमिर खानने या मिटिंगसाठी विनंती केली होती. भेटीदरम्यान खानने एमिन एर्दोगन यांना त्याने सुरू केलेल्या सामाजिक जबाबदारीच्या प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये आमिर आणि त्याची पत्नी किरण राव यांनी स्थापना केलेल्या वॉटर फाउंडेशनचादेखील समावेश आहे. या माध्यमातून भारतातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचविण्याची आमिर खानची योजना आहे.
पहा ट्वीट -
I had the great pleasure of meeting @aamir_khan, the world-renowned Indian actor, filmmaker, and director, in Istanbul. I was happy to learn that Aamir decided to wrap up the shooting of his latest movie ‘Laal Singh Chaddha’ in different parts of Turkey. I look forward to it! pic.twitter.com/3rSCMmAOMW
— Emine Erdoğan (@EmineErdogan) August 15, 2020
आमिर खानने सांगितले की, तुर्कीची फर्स्ट लेडी महत्त्वपूर्ण सामाजिक प्रकल्पांवर काम करत असून, मानवतावादी मदत उपक्रमही करीत आहे. त्याच वेळी, एमिन एर्दोगनने खानचे त्याच्या चित्रपटांमध्ये धैर्याने सामाजिक समस्या दाखवल्याबद्दल अभिनंदन केले. खान आणि एर्दोगान यांच्यात झालेल्या संभाषणादोन्ही देशांमधील खाद्य संस्कृती आणि हस्तकलेसारख्या मुद्द्यांचाही समावेश होता. तसेच आमिर खानने दोन्ही देशांमधील समान कुटुंबव्यवस्था व भाषेबद्दलही चर्चा केली.
याबाबत ट्वीट करताना, एमीन एर्दोगान म्हणतात, ‘अमीर खान, जगप्रसिद्ध भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना इस्तंबूल येथे भेटून मला खूप आनंद झाला. आमिरने तुर्कीच्या वेगवेगळ्या भागात ‘लालसिंग चढ्ढा’ या त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करण्याचा निर्णय घेतला याचा मला आनंद झाला.’ (हेही वाचा: Kangana Ranaut on Joining Politics: कंगना रनौत म्हणते माझंं घराणंं राजकारणात मोठंं नाव, मणिकर्णिका नंंतर BJP ने सुद्धा दिली निवडणुकीची ऑफर)
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून आमिर खान तुर्कीमध्ये आहे. खान बॉलिवूडमध्ये 1994 चा क्लासिक चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा रिमेक बनवित आहे. 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे शूटिंग तुर्कीमधील वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणार आहे. खान निगडे, अडाना आणि इस्तंबूलमध्ये शूट करणार आहे. त्यांनी एमीन एर्दोगन यांना चित्रपटाच्या सेटवर येण्याचे आमंत्रणही दिले आहे.