Krrish (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आजकाल त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबाबत चर्चेत आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नवीन सुरुवात करत असताना, तो त्याच्या कामावरही चांगलेच लक्ष केंद्रित करत आहे. तो त्याच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटामुळे चर्चेत तर आहेच, याशिवाय हृतिक त्याच्या सुपरहिट फ्रँचायझी चित्रपट 'क्रिश'च्या पुढील भागासाठी माध्यमांमध्ये झळकत आहे. अशा परिस्थितीत, 'क्रिश 4' (Krrish 4) बद्दल एक मोठे अपडेट समोर येत आहे, जे ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना खचितच खूप आनंद होईल.

हृतिक रोशनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'क्रिश 4' च्या कथेबद्दल एक मोठे आणि मनोरंजक अपडेट समोर येत आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 'क्रिश 4' ची कथा ही 'क्रिश 3' जिथे संपला होता तिथून सुरु होईल. फ्रँचायझीचा हा चौथा भाग क्रिश 3 ची कथा पुढे नेईल, परंतु यात नवीन पात्र असतील. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या कथेत पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक ट्विस्ट दाखवले जाणार आहेत.

दिग्दर्शक राकेश रोशन सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर वेगाने काम करत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टला अंतिम टच दिल्यानंतरच कास्टिंगचे काम सुरू होईल. हृतिक रोशनने 2006 मध्ये 'क्रिश'ची 15 वर्षे पूर्ण करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'क्रिश 4' ची घोषणा केली होती. अभिनेत्याने घोषणा करण्यासाठी चाहत्यांसह एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. (हेही वाचा: बहिष्काराच्या ट्रेंडमुळे हैराण झालेला अभिनेता अर्जुन कपूरने दिली तिखट प्रतिक्रिया, म्हणाला...)

बॉलीवूडचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी 2003 मध्ये आलेल्या 'कोई मिल गया' या चित्रपटाद्वारे 'क्रिश' फ्रेंचायझीची सुरुवात केली. या चित्रपटाने लोकांच्या हृदयात अशी जागा निर्माण केली, जी आजही इतर कोणता चित्रपट घेऊ शकला नाही. यानंतर तीन वर्षांनी 'क्रिश' आणि 2013 मध्ये 'क्रिश 3' हा चित्रपट पडद्यावर आला. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. आता फ्रेंचायझीच्या चौथ्या भागाला आणि त्यांच्या देसी सुपरहिरो 'क्रिश'ला प्रेक्षक किती प्रेम देतात हे पाहावे लागेल.