Kirron Kher Diagnosed With Multiple Myeloma: अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सरचे निदान; पती अनुपम खेर यांनी दिली माहिती
Kirron Kher and Husband Anupam Kher (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर (Kirron Kher) यांच्याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरण खेर यांना एक प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगाचे (Blood Cancer) निदान झाले आहे. या बातमीबाबत किरण यांचे पती अनुपम खेर (Anupam Kher) आणि मुलगा सिकंदर खेर यांनी अधिकृत निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी किरण यांना रक्ताचा कर्करोग झाल्याची पुष्टी केली आहे आणि त्याचबरोबर लोकांना किरण खेरसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. अनुपम खेर यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे, 'अफवांच्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते, म्हणून मी आणि सिकंदर आपणास माहिती देत आहोत की,  किरण खेर मल्टिपल मायलोमा (Multiple Myeloma) या आजाराने ग्रस्त आहेत. हा एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि मला खात्री आहे की ती लवकरच पूर्ण बरी होईल. आम्ही खूप भाग्यवान आहोत की तिच्यावर उत्कृष्ट डॉक्टरांच्या टीमद्वारे उपचार केले जात आहेत. ती नेहमी फायटर राहिली आहे व आताही ती यातून बाहेर पडेल.'

अनुपम खेर यांनी पुढे लिहिले आहे, ‘किरण खेर जे काही करते ते मनापासून करते. तिच्या हृदयात नेहमीच प्रेम असते आणि म्हणूनच लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही किरणसाठी तुमच्या प्रार्थना अशाच पाठवत राहा. सध्या ती ठीक आहे आणि रिकव्हर होत आहे. तुमचे प्रेम आणि सपोर्टबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’ (हेही वाचा: Bappi Lahiri Tested COVID-19 Positive: सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात घेत आहेत उपचार)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबरमध्ये किरण खेर यांच्या हाताला जखम झाल्याने त्या रूग्णालयात गेल्या होत्या, जिथे त्यांचे कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांना मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे परंतु उपचारासाठी त्यांना रुग्णालयात जावे लागते.