Darshan Thoogudeepa | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रेणुकास्वामी हत्या प्रकरणात (Renukaswamy Murder Case) कोठडीत असलेला कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीप (Darshan Thoogudeepa) याला कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. प्रकृती अस्वास्थ्य आणि एका महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेसाठी त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याने केलेल्या विनंती अर्जाचा विचार करुन न्यायमूर्ती एस. विश्वजीत शेट्टी यांच्या खंडपीठाने त्यास जामीन मंजूर केला. दर्शन यास वैद्यकीय उपचारासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देत जामीन मिळाला आहे. हा जामीन केवळ त्याच्या वैद्यकीय उपचार आणि आणि आरोग्यापुरताच सीमित आहे. त्याचा सुरु असलेल्या खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कन्नड चित्रपट उद्योगात मोठी खळबळ

रेणुकास्वामी हत्या प्रकरणात अभिनेता दर्शन थूगुदीप याचे नाव आले आणि कन्नड चित्रपट उद्योगात मोठी खळबळ उडाली. हे एक हायप्रोफाईल प्रकरण प्रसारमाध्यमे आणि सामान्य जनतेचे लक्ष सुरुवातीपासूनच वेधून घेत आहे. कर्नाटकच्या न्यायव्यवस्थेत कायदेशीर कारवाई सुरूच असल्याने या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरुच आहे. अभिनेत्यास मिळालेला तात्पूरता जामीन हा त्याच्यासाठी दिलासा आहे. परंतू, त्याच्यावर असलेला वैद्यकीय उपचारांचा कालावधी संपला की, त्यास पुन्हा एकदा कोठडीत परतावे लागेल. कायदेशीर तज्ञ यावर जोर देतात की जेव्हा आरोग्याची वैध चिंता सिद्ध होते तेव्हा वैद्यकीय कारणांसाठी अंतरिम जामीन भारतीय न्यायालयांमध्ये प्रचलित आहे. (हेही वाचा, Rhea Chakraborty ला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; काय आहे प्रकरण? वाचा)

दर्शन थूगुदीप याच्यावर खटला सुरुच

दरम्यान, अभिनेता दर्शन थूगुदीप याच्यावर खटला सुरु असतानाच त्यास वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरले. त्यामुळे त्यास जामीन मिळणे आवश्यक होते. न्यायालयानेही त्यास जामीन मंजूर केला. अर्थात त्याच्या जामिनाचा कालावधी संपल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही पुन्हा सुरू होईल. दर्शनच्या आरोग्याबद्दल आणि उपचारांबद्दलचे तपशील उघड झाले नसले तरी, हे हाय-प्रोफाइल प्रकरण व्यापक लक्ष वेधून घेत आहे. (हेही वाचा -Rhea Chakraborty Summons In HIBOX Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांची नोटीस)

भारतीय कायद्यांनुसार, कोणत्याही गुन्हा अथवा खटल्यातील आरोपीस वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर केला जातो. या आधीही अनेक खटल्यांमध्ये विध आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. ज्यामध्ये राजकारणी, अभिनेते, खेळाडू, कुख्यात गुन्हेगार यांचाही समावेश आहे. अलिकडे महाराष्ट्रापुरते बोलायचे तर माजी मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत हे सध्या विविध प्रकरणांमध्ये जामीनावरच बाहेर आहेत. कोणत्याही व्यक्तीस अटक केल्यानंतर त्यास जामीन मिळणे हा त्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये सांगितले आहे.