कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजविला असून लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसेच दक्ष नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत आहेत. गर्दी टाळावी यासाठी सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालयेही 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच चित्रपट, मालिकांचे चित्रीकरणही तूर्तास थांबविण्यात आले आहे. ही भीषण परिस्थिती पाहता कबीर खान दिग्दर्शित आगामी चित्रपट '83' चे प्रदर्शनही लांबणीवर टाकण्यात आले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या रणवीर सिंह (Ranveer Singh) ने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेटची शान असलेले क्रिकेटपटू कपिल देव यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव (Kapil Dev) च्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र सध्या कोरोना व्हायरसचे भयाण संकट पाहता चित्रपटाच्या टीमने याचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे.
पाहा ट्विट:
हेदेखील वाचा- '83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो
"हा चित्रपट केवळ आमचा चित्रपट नसून संपूर्ण भारताचा चित्रपट आहे. पण देशातील लोकांचे आरोग्य आणि सुविधा हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे," असे रणवीर सिंह याने या पोस्टखाली म्हटले आहे.
दरम्यान बाजीराव रणवीर सिंह केवळ लूक मधूनच नाही तर अभिनयातून सुद्धा कपिल देव साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या या तयारीचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला होता. 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता, 83 या सिनेमात त्या वेळेसचा इंडियन टीमचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात रणवीर सिंग सोबत दीपिका पादुकोण सुद्धा एक कॅमिओ रोल साकारणार आहे.