बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा आज देशभर चर्चेचा विषय आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात सोनू सूदने लाखो प्रवासी कामगारांना आपापल्या घरी पोहोचवले होते. अनेक कामगारांना त्याने नोकऱ्याही दिल्या आहेत आता परप्रांतीय कामगारांना मदत करण्यासोबतच सोनू सूद विद्यार्थ्यांना पाठिंबा देताना दिसत आहे. सोनू सूदने संयुक्त प्रवेश परीक्षा (Joint Entrance Examination) म्हणजेच जेईई मेन (JEE Main) आणि राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET Exam रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात विद्यार्थ्यांनीही नीट-जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा देत अनेक राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोना संक्रमणाच्या दरम्यान जेईई मेन आणि नीट परीक्षांचे आयोजन अनुचित असल्याचे सोनू सूदने ट्विट केले आहे. पीएमओ आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला टॅग करत सोनू सूद आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, 'देशातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मी भारत सरकारला विनंती करतो. आपण या परिस्थितीमध्ये खूप जास्त काळजी घेणे गरजेचे आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आणू नये.'
सोनू सूद ट्वीट -
It's my request to government of India, to postpone the #Neet/#JEE exams in the current situation of the country! In the given #COVID19 situation, we should care utmost & not risk the lives of students! #PostponeJEE_NEETinCOVID@EduMinOfIndia @PMOIndia
— sonu sood (@SonuSood) August 25, 2020
दरम्यान, जेईई मेन 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान आणि 13 सप्टेंबरला नीट आयोजित केले जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने 17 ऑगस्ट रोजी स्पष्ट केले होते की या परीक्षा वेळेवर होतील. जेईई मेन आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या वर्षाच्या मेमध्ये जेईई मेन आणि नीट परीक्षा घेण्यात येणार होत्या, पण नंतर जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे सप्टेंबरमध्ये या परीक्षा घेण्याचे ठरले आहे.