बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीचे सत्य सतत लोकांसमोर मांडत आली आहे. यामुळे कंगनाला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. एकीकडे, बीएमसीने कंगना रनौतचे कोट्यावधी रुपयांचे कार्यालय तोडले आहे, तर दुसरीकडे, आता इतर बॉलिवूड सेलेब्स कंगना रनौतच्या विरोधात उभे ठाकले आहेत. कंगनाने ज्या सेलेब्जबाबत वक्त्यव्ये केली होती असे काही लोक कंगनावर भडकले आहेत. आता यामध्ये लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे नाव सामील झाले आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरूद्ध मानहानीचा (Defamation) खटला दाखल केला आहे.
कंगना राणौतने काही काळापूर्वी एका मुलाखती दरम्यान दावा केला होता की, जावेद अख्तर यांनी तिला आपल्या घरी बोलावले होते आणि हृतिक रोशन प्रकरणात जास्त बोलू नको, अन्यथा तुझी कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी दिली होती. जावेद अख्तर यांनी कंगनाला चर्चेसाठी आपल्या घरी बोलावून हृतिकची माफी मागण्याबाबत धमकी दिली असल्याचे कंगना रनौतने सांगितले होते. आता जावेद अख्तर यांनी कंगना रनौतने केलेला दावा निराधार व खोटा असल्याचे सांगितले आहे. याच बाबतच त्यांनी आता अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी स्पॉटबॉयला सांगितले की, 'जावेद साहेब अतिशय शांत स्वभावाचे आहेत पण यावेळी गोष्टी मर्यादेच्या पलीकडे गेल्या आहेत. अशा परिस्थितीत आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जावेद साहब यांनी कंगना रनौतवर मानहानीचा दावा दाखल केला आहे. हे प्रकरण आता कोर्टात आहे आणि जावेद साहेब मोठी लढाई लढण्यास तयार आहेत. जावेद साहब कोर्टाबाहेर कोणताही तोडगा काढणार नाहीत.’ (हेही वाचा: मुंबई पोलिसांकडून कंगना रनौत हिच्यासह बहिण रंगोली चांडेल यांना समन्स, 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश)
8 महिन्यांपूर्वी कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेलने आपल्या ट्विटमध्ये जावेद अख्तर यांच्यावर कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते. ‘जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी धमकावले.’ यासह, सोशल मीडिया पोस्टद्वारे समुदायांमध्ये धार्मिक मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या एफआयआरनंतर, आता मुंबई पोलिसांनी कंगना रनौत आणि तिची बहिण कंगना रनौतला चौकशीसाठी 10 नोव्हेंबरला हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत.