मुंबई उच्च न्यायालयाकडून Kangana Ranaut आणि Rangoli Chandel यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण; 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश
Kangana Ranaut, Rangoli Chandel (Photo Credits: Twitter)

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि बहीण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र देशद्रोहाच्या प्रकरणात 8 जानेवारीला त्यांनी मुंबई पोलिसांसमोर हजर राहावे असाही आदेश दिला आहे. यासह कंगना रनौत आणि रंगोली चंदेल यांच्या विरुद्धच्या एफआयआरबाबत पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले. आहेत. लवकरच या दोघी त्यांच्या स्टेटमेन्ट रेकॉर्डिंगसाठी उपस्थित राहतील.

आपल्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करण्यासाठी कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सोशल मीडिया पोस्टद्वारे समाजात द्वेष आणि जातीय तणाव निर्माण केल्याप्रकरणी ही एफआयआर नोंदविण्यात आली आहे. वांद्रे दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशानंतर दाखल झालेल्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचाही आरोप केला आहे. त्यानंतर मजिस्ट्रेट कोर्टाने पोलिसांना कंगना रनौत आणि तिच्या बहिणीविरूद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. (हेही वाचा: भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर)

या प्रकरणी दोन्ही बहिणींना तीन वेळा पोलिसांसमोर हजर होण्यासाठी समन्स बजावला होता मात्र तीनही वेळी त्यांनी तो धुडकावला. आता त्यांनी आपल्याबाबतची एफआयआर रद्द व्हावी यासाठी कोर्टात धाव घेतली, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने बहिणींवरील खटला रद्द केला नाही. कुटुंबातील लग्न सोहळ्यामध्ये व्यस्त असल्याने मुंबई पोलिसांसमोर हजार राहू शकलो नसल्याचा युक्तिवाद न्यायाधीशांनी नाकारला. याआधी 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी आणि 9 आणि 10 नोव्हेंबरला दोन्ही बहिणींना बोलावण्यात आले होते, पण त्या पोलिसांसमोर हजर झाल्या नाहीत.

आज कंगना आणि रंगोलीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, एफआयआर बाबत दोन्ही बहिणी सोशल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कोणतीही टिपण्णी करणार नाहीत. याबाबतची पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत तरी कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र त्याआधी दोघींना 8 जानेवारी रोजी पोलिसांसमोर हजार राहावे लागेल.