Ranveer Allahbadia on Samay Raina's 'India's Got Latent' Show (Photo Credits: X)

India's Got Latent Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या यूट्यूब शोच्या अलीकडील भागात यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या कमेंटमुळे खळबळ उडाली आहे. या शोमधील कंटेंटवर सोशल मीडियावर टीका होत आहे. रणवीरच्या विधानावर सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. या सगळ्यामध्ये, महाराष्ट्र सायबर सेलने शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींना समन्स बजावले आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याचाही समावेश आहे. याशिवाय, राष्ट्रीय महिला आयोगाने समय, रणवीर आणि सोशल मीडिया प्रभावक अपूर्वा मखीजा यांच्याविरुद्धही तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूब शोविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, या प्रकरणात एकूण 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंतच्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि सर्वांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल.

अशाप्रकारे या शोचे जुने भाग आणि त्यात दिसणारे पाहुणे धोक्यात आले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी तीव्र झाली आहे. यात सिद्धांत चतुर्वेदी, उर्फी ​​जावेद, राखी सावंत, दीपक कलाल, दिलीन नायर उर्फ ​​रफ्तार, तन्मय भट, हर्ष लिंबाचिया, भारती सिंग सामील आहेत. 'इंडियाज गॉट लेटेंट' मध्ये रणवीरने एका स्पर्धकाला पालकांच्या लैंगिक संबंधाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर बरीच टीका सुरु आहे. तक्रारींनंतर हा व्हिडिओ YouTube वरून काढून टाकण्यात आला आहे. दुसरीकडे अहवालानुसार, 'इंडियाज गॉट लेटेंट'चा होस्ट समय रैना सध्या देशाबाहेर आहे. पोलीस त्याच्या मॅनेजरच्या संपर्कात आहेत. त्यांनी माहिती दिली की, समय परदेशात आहे आणि 17 मार्च रोजी भारतात परतेल. (हेही वाचा: FIR Against Elvish Yadav: खोटा व्हिडीओ पोस्ट करून नव्या वादात अडकला यूट्यूबर एल्विश यादव; राजस्थान पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी जयपूरमध्ये गुन्हा दाखल)

दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील या प्रकरणावर कारवाई केली आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमात केलेल्या अपमानास्पद आणि जातीयवादी टिप्पण्यांना एनसीडब्ल्यूने गांभीर्याने घेतल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी रणवीर अलाहबादिया, समय रैना, अपूर्व माखीजा, जसप्रीत सिंग, आशिष चंचलानी, तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना 17 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोग कार्यालयात वैयक्तिक सुनावणीसाठी समन्स बजावले आहेत.