![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/11/75.jpg?width=380&height=214)
सोशल मीडिया स्टार आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याआधी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता पुन्हा एकदा एका नवीन वादाबाबत एल्विश यादव चर्चेत आहे. तो एका गाण्याच्या शूटिंगसाठी जयपूरला आला होता. यादरम्यान, त्याने यूट्यूब व्हीलॉगवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये 112 हेल्पलाइनची गाडी त्याला एस्कॉर्ट करताना दिसत आहे. या म्युझिक व्हिडिओ शूटसाठी राजस्थान पोलिसांनी त्याला एस्कॉर्ट केले होते असा दावा करणारा हा व्हिडीओ होता. मात्र आता समोर आले आहे की, एल्विश यादवला कोणताही पोलीस एस्कॉर्ट देण्यात आला नव्हता. दिशाभूल करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल युट्यूबर एल्विश यादवविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की एल्विशने स्वतः त्या गाडीच्या मागे गाडी चालवताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल केला. तर सोमवारी एल्विश यादवने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडीओमध्ये तो राजस्थानचे माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांचे पुत्र कृष्णवर्धन सिंह खाचरियावास यांच्या कारमधून प्रवास करताना दिसत होता. व्हिडिओमध्ये, कृष्णवर्धनच्या गाडीच्या पुढे पोलिसांचे वाहन जात असल्याचे दिसत आहे आणि एल्विश यादव दावा करत आहेत की पोलीस त्याला एस्कॉर्ट करत होते.
मात्र राजस्थान पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ म्हणाले की, युट्यूबरला असा कोणताही एस्कॉर्ट देण्यात आला नव्हता. या व्हिडिओद्वारे राजस्थान पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामेश्वर सिंह यांनीही सांगितले की, एल्विश यादवला कोणतीही सुरक्षा किंवा सुरक्षारक्षक देण्यात आला नव्हता. केवळ स्थापित प्रोटोकॉलनुसारच पोलीस संरक्षण दिले जाते. त्यामुळे आता राजस्थान पोलिसांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारा ‘बनावट व्हिडिओ’ शेअर केल्याच्या आरोपाखाली यादव याच्याविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Indias Got Latent Controversy: महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कारवाई; अश्लील कंटेंट तयार आणि प्रकाशित केल्याबाबत 30 ते 40 जणांविरुद्ध दाखल केला एफआयआर)
दरम्यान, एल्विश यादवचा हा व्हिडिओ एल्विश यादव व्लॉग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना, युट्यूबरने ‘राजस्थानमधील संपूर्ण प्रोटोकॉल’ असे नाव दिले आहे. या व्हिडिओची एकूण लांबी 15 मिनिटे आणि 16 सेकंद आहे, ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस गाड्या एल्विश यादवच्या गाडीला एस्कॉर्ट करताना दिसत आहेत.