Paramhans Acharya (संग्रहित संपादित प्रतिमा)

शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. वादाचे कारण म्हणजे चित्रपटामधील एका गाण्यात दीपिका पदुकोणने परिधान केलेला ड्रेस. चित्रपटामधील गाण्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये नाचताना दिसत आहे. या गाण्याबद्दल हिंदू-मुस्लिम दोन्ही बाजूंकडून आक्षेप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी निदर्शने होत आहेत तर काही ठिकाणी पुतळे जाळले जात आहेत. या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटले.

'पठाण' या चित्रपटाविरोधात संत समाजही सातत्याने आंदोलन करत आहे. आता अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनीही मंगळवारी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. आपल्या सनातन धर्माचे लोक या बाबत सातत्याने विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला जिहादी शाहरुख खान मिळाला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन.’

परमहंस आचार्य पुढे म्हणाले की, ‘पठाण हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला त तो पेटवून दिला जाईल. सध्या तर फक्त शाहरुख खानचे पोस्टर्स जाळले आहेत. पण शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळण्यात येईल.’ यावेळी शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावर सर्वांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. याआधी हनुमानगढीचे पुजारी राजू दास यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. (हेही वाचा: एम्पायर मॅगझिनच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत Shah Rukh Khan ला स्थान; असा मान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता)

'पठाण' या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यातील काही दृश्यांवर आणि दीपिका पदुकोणच्या भगव्या पेहरावावर विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) आधीच आक्षेप घेतला आहे. त्यांनी यामध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)शी संलग्न असलेल्या व्हीएचपीने दीपिकाच्या पोशाखाच्या रंगावर नाराजी व्यक्त केली आहे. 'बेशरम रंग' या गाण्याच्या शीर्षकावर संघटनेने आक्षेप घेत असा चित्रपट हिंदू समाज कधीही स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पठाण या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यातील भगव्या बिकिनीबाबत एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार मुंबई पोलिसांना मिळाली आहे.