Hrithik Roshan and Tiger Shroff in War (Photo Credits: Twitter)

हृतिक रोशन (Hrithik Roshan), टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) स्टारर अ‍ॅक्शन फिल्म, ‘वॉर’ (War) बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट काल, 2 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. गांधी जयंती निमित्त सुट्टी असल्याने हा चित्रपटाला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तबल 53.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने चित्रपट सृष्टीमधील आतापर्यंतचे 5 विक्रम मोडीत काढले आहेत.

तरण आदर्श ट्विट - 

अॅव्हेनर्स एंडगेम जेव्हा भारतात प्रदर्शित झाला होता तेव्हा सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाच्या प्रीबुकिंगमुळे ऐनवेळी तिकिट्सची उपलब्ध नव्हती. मात्र आश्चर्य म्हणजे वॉर चित्रपटाने अॅव्हेनर्स एंडगेमच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. सोबतच या चित्रपटाने अजून 5 रेकॉर्ड मोडले आहेत,

> आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग -

अ‍ॅक्शन फिल्म ‘वॉर’ हा हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोच्च ओपनर ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड ‘ठग्ज ऑफ इंडिया’च्या नावावर होता.

> सर्वात मोठा फेस्टिव्हल रिलीज –

महात्मा गांधी जयंती निमित्त सुट्टी असल्याने या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांनी फार प्रयत्न केला होता. आता या चित्रपटाची कमाई पाहता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे. कोणत्याही सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये ‘वॉर’ अव्वल ठरला आहे.

> हृतिक रोशनसाठी सर्वात मोठे ओपनिंग –

याधीही हृतिक रोशनने आपल्या सुपर 30 द्वारे चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या चित्रपटासह वॉरलादेखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. हा चित्रपट हृतिक रोशनसाठी सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. (हेही वाचा: War Meta Review : जाणून घ्या टायगर आणि हृतिकमधील 'वॉर' आहे तरी कसा?)

> टायगर श्रॉफसाठी सर्वात मोठे ओपनिंग –

टायगरचा हा 7 वा चित्रपट आहे. त्याच्यासाठी आपल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हा चित्रपट सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

> ऑस्ट्रेलियातील हिंदी चित्रपटाचे सर्वोच्च ओपनिंग –

या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली ओळख निर्माण केली आहे. ऑस्ट्रेलियन चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट 2019 चा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी A$ 130, 682 रुपयांचा व्यवसाय केला आहे. याने गल्ली बॉय, भारत आणि कलंकच्या कलेक्शनला मागे टाकले आहे.

दरम्यान, ‘वॉर’ भारतात हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये एकूण 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. परदेशात या चित्रपटाला 1350 स्क्रीन्स मिळाल्या आहेत.