Shyam Ramsay Death: आपल्या भयपटांनी प्रेक्षकांची झोप उडवणारे दिग्दर्शक श्याम रामसे काळाच्या पडद्याआड, आज होणार पार्थिवावर अंत्यसंस्कार
Shyam Ramsay (Photo Credits: Wiki Commons)

आपल्या भयपटांनी प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडविणारे दिग्दर्शक श्याम रामसे (Shyam Ramsay) यांचे बुधवारी (18 सप्टेंबर) रोजी निधन झाले. श्याम रामसे गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनिया ने ग्रस्त होते. मुंबईतील एका रुग्णालयात ते उपचार घेत होते. ते 67 वर्षांचे होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपुर्ण हिंदी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. श्याम रामसे यांचे पुतणे अमित रामसे यांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे. 70 ते 80 च्या दशकात उत्तम भयपट बनवणारे दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने त्यांचे कुटूंब शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांना साशा आणि नम्रता या मुली आहेत.

दूरदर्शनच्या वाहिनी आल्यानंतर पहिल्यांदा रामसे बंधूनी भूत, आत्मा या गोष्टी पडद्यावर आणल्या. यात श्याम रामसे यांचेही मोठं योगदान आहे. त्यांनी 70 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत हॉरर सिनेमा आणला. श्याम रामसे यांनी अंधेरा (Andhera) (1975), सबूत (Saboot) (1980), पुराना मंदिर (1984), पुरानी हवेली (1980), कोई है (2017), वीराना, बंद दरवाजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हेही वाचा- 'Bhoot: Part One - The Haunted Ship' फर्स्ट लूक रिलीज, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता विक्की कौशलला पडले होते 13 टाके

17 मे 1952 साली जन्मलेल्या श्याम रामसे यांनी अनेक संस्मरणीय भयपट देऊन हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी एकूण 30 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपट निर्माते सुमित काडेल यांनी श्याम रामसे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रामसे यांनी अनेक संस्मरणीय अशा भयपटांची निर्मिती केल्याचे ते म्हणाले.

श्याम यांनी त्यांचे बंधू तुलसी रामसे यांच्यासोबतीने भारतीय दूरचित्र वाहिन्यांवर हॉरर शैलीच्या मालिका आणल्या. 1993 ते 2001 पर्यंत चाललेली झी हॉरर शो ही त्यांनी भारतीय वाहिन्यांवर आणलेली पहिली मालिका ठरली. ही भयपट मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले जी लोकांच्या आजही स्मरणात आहे.