पुन्हा प्रदर्शित होणार ऐतिहासिक चित्रपट 'पानिपत'; विवादानंतर काही सीन्समध्ये बदल करण्यास आशुतोष गोवारीकर यांची संमती
Ashitosh govarikar And Panipat (PC - File Image)

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांनी,आपल्या आगामी ‘पानिपत’ (Panipat) या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडला आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता या चित्रपटाच्या वादानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी, यातील वादग्रस्त सीन्स हटवण्यासाठी राज्य सरकारकडे सहमती दर्शविली आहे. चित्रपटातील असे सीन्स काढून, नव्याने काही गोष्टी सामील करून तो सेन्सॉर बोर्डाकडे पाठविला जाईल. सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाल्यानंतर तो राजस्थानच्या चित्रपटगृहात दाखविला जाईल.

मंगळवारी जाट महासभा आणि करणी सेनेच्या पदाधिका्यांनी चित्रपटाचा खास शो पाहिला आणि त्यानंतर याबाबतचा निषेध कायम ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर चित्रपटातील वादग्रस्त सीन्स बदलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. चित्रपटामध्ये भरतपूरचे तत्कालीन महाराज सूरजमल यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने मांडली असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर याबाबत निषेध सुरु झाल्याने हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला.

राज्यातील अर्ध्याहून अधिक चित्रपटगृहांमधून हा चित्रपट हटवण्यात आला आहे. राजस्थान फिल्म ट्रेड अँड प्रमोशन कौन्सिलचे सरचिटणीस राज बंसल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. काल राजधानी जयपूरसह बिकानेर, नागौर, श्रीगंगानगर, जोधपूर, हनुमानगड येथे हा चित्रपट पडद्यावरून काढून टाकण्यात आला आहे. आता काही बदल करून नव्याने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

(हेही वाचा: पानिपत प्रदर्शित होणारच; न्यायालयाने फेटाळून लावली विश्वास पाटील यांची याचिका, ‘ऐतिहासिक घटनांवर स्वतःचा अधिकार सांगणे अयोग्य’)

दरम्यान, अर्जुन कपूर, कृती सेनन आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेला पानिपत प्रदर्शित होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहेत. प्रदर्शनानंतर महाराष्ट्रसोडून इतर राज्यांत पानिपत काही खास कमाल दाखवू शकला नाही. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वेबसाइटनुसार, मंगळवारी या चित्रपटाने 2 ते 2.50 कोटींचा व्यवसाय केला. अशाप्रकारे आतापर्यंत या चित्रपटाने पाच दिवसांत 22.5 कोटींचा आकडा पार केला आहे.