Grammy Awards 2021: कोरोना महामारीमुळे 'ग्रॅमी पुरस्कार' पुढे ढकलला; आता 'या' तारखेला होणार कार्यक्रमाचे आयोजन
Grammy Award (PC - Wikimedia Commons)

Grammy Awards 2021: जगभरात कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मोठी विध्वंस झाला आहे. आतापर्यंत लाखो लोक या साथीच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोना विषाणूमुळे देशभरातीलचं नव्हे, तर संपूर्ण जगातील विशेष कार्यक्रम पार पडू शकलेले नाहीत. यावर्षी होणारा बहुचर्चित ग्रॅमी अवॉर्ड शो देखील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. हा कार्यक्रम 31 जानेवारी रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणार होता. परंतु, अमेरिकेच्या बर्‍याच भागांमध्ये कोरोना विषाणूची साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. यामुळे संयोजकांनी मार्चमध्ये ग्रॅमी पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एक निवेदन प्रसिद्ध करताना संगीत कंपनी द रेकॉर्डिंग अॅकॅडमीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, ग्रॅमी अवॉर्ड शो 31 जानेवारी ते 14 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. त्याच वेळी शोच्या आयोजकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉस एंजेलिसमधील कोविड-19 ची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांमध्ये वाढ झाल्याने रुग्णालयातील आयसीयू सेवा अपूर्ण पडत आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही आपला कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहोत, असंही निवेदनात म्हटलं आहे. (वाचा - Drugs Case: NCB कडून अर्जुन रामपाल च्या बहिणीला समन्स; ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहाव लागणार)

दरम्यान, आयोजकांनी पुढे म्हटलं आहे की, आरोग्य आणि सुरक्षा यापेक्षाही काहीही महत्त्वाचं नाही. कारण, शेकडो संगीतकार आणि शो तयार करणार्‍या लोकांचे आरोग्य खूप महत्वाचे आहे. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. 2021 चा ग्रॅमी अवॉर्ड शो स्टेपल्स सेंट्रल, लॉस एंजेलिस येथे होणार आहे. परंतु, कोरोना साथीच्या आजारामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.