Global Celebrity Influencers on Instagram: इंस्टाग्रामवरील प्रभावशाली सेलिब्रटी यादीमध्ये Alia Bhatt सहाव्या स्थानावर; Jennifer Lopez सह प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार यांना टाकले मागे
आलिया भट्ट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

अलीकडेच रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकलेल्या आलिया भट्टने (Alia Bhatt) 2012 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पदार्पणाच्या काही वर्षांतच आलियाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिची बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्रींमध्येच गणना केली जाते. यासोबतच तिच्याकडे अनेक चित्रपट आणि जाहिरातींच्या ऑफरही आहेत. दुसरीकडे, ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, आता आलिया भट्टने असे स्थान मिळवले आहे, ज्याची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.

आलियाला मिळालेल्या यशामुळे ती आता 'ग्लोबल स्टार' बनली आहे. आलिया भट्टने इंस्टाग्रामवर सिनेजगतातील टॉप 10 प्रभावशाली (अभिनेते आणि अभिनेत्री) यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे. आलिया ही एकमेव भारतीय आणि आशियाई सेलिब्रिटी आहे जी टॉप 10 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आहे. याच यादीत प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, श्रद्धा कपूर आणि रश्मिका मंदान्ना देखील अनुक्रमे 13,14, 18 आणि 19 व्या स्थानावर आहेत.

अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका झेंडाया या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी टॉम हॉलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढे अनुक्रमे ड्वेन जॉन्सन, दक्षिण कोरियाचा रॅपर जे होप आणि विल स्मिथ हे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आलिया सहाव्या क्रमांकावर, तर जेनिफर लोपेझ आलियापेक्षा मागे सातव्या क्रमांकावर आहे. हॉलिवूडच्या या टॉप सेलेब्समध्ये आपले स्थान निर्माण करणारी आलिया भट्ट ही एकमेव हिंदी फिल्म स्टार आहे.

10 वर्षात आलिया भट्टने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. आलिया अलीकडेच एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात आणि त्याआधी संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात दिसली होती. 14 एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकलेली आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'ब्रह्मास्त्र' आणि 'डार्लिंग्स' या दोन महत्वाच्या चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत आहे. (हेही वाचा: Indian Police Force: शिल्पा शेट्टीनंतर विवेक ओबेरॉयही दिसणार रोहित शेट्टीच्या वेब सीरिजमध्ये)

दरम्यान, आलिया भट्ट तिच्या हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये नाव कमावणार आहे. स्पाय थ्रिलर ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तिच्या विरुद्ध 'वंडर वुमन' फेम गाल गडोत दिसणार आहे.