अनुराग कश्यप (Anurag kashyap) यांच्या गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of wasseypur) या सिनेमाने प्रदर्शनानंतर बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. वास्तववादी सिनेमाला भारतीय प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला कदाचित हा पहिलाच प्रसंग होता. आता इतक्या वर्षांनी सुद्धा हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'द गार्डियन' (The Guardian) तर्फे अलीकडेच 21 व्या शतकातील 100 उत्कृष्ट सिनेमांची एक यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर ला 59वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीत समाविष्ट होण्याचा मान मिळालेली हा एकमेव चित्रपट ठरला आहे.
अनुराग कश्यप याने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याविषयी माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय अनुरागनेही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे मात्र जर का मी अशी यादी बनवली असती तर यात अन्य अनेक चित्रपटांचा समावेश केला असता, असे म्हंटले आहे. या यादीत पहिल्या स्थानी पॉल थॉमस अँडरसन यांचा 2007 मधील 'There Will Be Blood' ही अगदी योग्य निवड आहे मात्र 'द डार्क नाइट' सिनेमाला आणखीन आधीच क्रमांक मिळायला हवा होता अशीही इच्छा अनुरागने व्यक्त केली.
अनुराग कश्यप इंस्टाग्राम पोस्ट
गँग्स ऑफ वासेपूर या सिरीज मधील चित्रपट हे 2012 मध्ये बॉक्स ऑफिसवर धडकले होते. झारखंडच्या वासेपूर जिल्हयातील ही कथा होती. यामध्ये दाखवण्यात आलेले वास्तव हे सिनेमाचे मूळ आकर्षण होते. मनोज वाजपेयी, नवाझुद्दीन सिद्दिकी, पीयूष मेहरा आणि ऋचा चड्ढा या सिनेमाला चार चांद लावले होते. इतकेच नव्हे तर यामुळे अनुराग कश्यप याच्या करिअरला सुद्धा एक नवी दिशा मिळाली होती. (सेक्रेड गेम्स 2 वादाच्या भोवऱ्यात; अनुराग कश्यप विरुद्ध FIR दाखल, एका शॉटमुळे UAE येथील व्यक्तीला जगभरातून फोन)
दरम्यान काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप याने स्वतः एका ट्विट मार्फत "गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा मी सात वर्षांपूर्वी केला आणि माझ्या आयुष्याची बरबादी झाली असे म्हंटले होते. यापुढे लिहिताना "मी हा सिनेमा काय बनवला लोकांना आता माझ्याकडून अशाच पद्धतीच्या सिनेमांची अपेक्षा आहे. कितीतरी वर्ष मी या अपेक्षेपासून दूर पळण्याचा प्रयत्न करूनही मला अपयशच हाती येत आहे असे म्हणत अनुरागने आता ही साडेसाती निदान 2019 च्या अंती तरी संपावी" अशी आशा व्यक्त केली होती, पण आता हा बहुमान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.