FIR Against Jimmy Sheirgill: अभिनेता जिमी शेरगिलविरुद्ध गुन्हा दाखल; कोरोना विषाणू नियमांचे केले उल्लंघन
Jimmy Sheirgill (Photo Credits: Instagram)

सध्या महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमध्येही (Punjab) कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) याच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन करून शुटींग केल्याप्रकरणी लुधियाना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुधियाना येथे 'यूअर ऑनर' या वेब सीरिजचे शूटिंग सुरु आहे, ज्यामध्ये जिमी काम करत आहे. यापूर्वी मंगळवारी सिरीजचे शूटिंग सुरु होते म्हणून टीमकडून दंड वसूल केला गेला होता. अभिनेता जिमी शेरगिलवर आरोप आहे की, या सिरीजच्या शूटिंगदरम्यान सामाजिक अंतर तसेच इतर नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली झाली आहे.

या प्रकरणी अभिनेता जिमी शेरगिल आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ईश्वर निवास यांच्यासह 35 क्रू मेंबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मंगळवारी रात्री कर्फ्यूमध्ये जेव्हा या सिरीजचे शुटींग सुरु होते त्यावेळी कोविड लॉकडाउनच्या नियमांचे पालन झाले नाही, असा आरोप या सर्वांच्यावर आहे. आता पोलिसांनी सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेता जिमी शेरगिलसह 35 जणांवर 3 साथीचा कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

एसआय मनिंदर कौर यांनी सांगितले की, जिमी शेरगिलची टीम गेल्या तीन दिवसांपासून आर्य स्कूलमध्ये एका पंजाबी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. यामुळे, शाळेच्या इमारतीचे रूपांतर सत्र कोर्टाच्या सेटमध्ये करण्यात आले होते. सोमवारी पोलिसांना अशी माहिती मिळाली की, तेथे शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन केले जात नाही, तसेच सेटवरील कोणाच्याही चेहर्‍यावर मास्क नाही. यामुळे एसीपी सेंट्रल वरियम सिंह यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडे दोन चालान फाडले होते.

(हेही वाचा: दिवंगत राजीव कपूर यांच्या संपत्तीच्या हक्कासाठी रणधीर कपूर व रिमा जैन यांची कोर्टात धाव; न्यायालयाने मागितला 'हा' पुरावा)

त्यानंतरही टीमने पुन्हा नियमांचे उल्लंघन केले. मंगळवारी उशिरा पोलिसांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान शूटिंग सुरू असून सेटवर जवळपास दीडशे लोक उपस्थित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पुन्हा छापा टाकला तेव्हा हे आरोप खरे असल्याचे आढळले. पोलिसांनी ताबडतोब 3 जणांना अटक केली, यामध्ये आकाश दीपसिंग, मनदीप आणि ईश्वर निवास यांचा समावेश आहे. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.