Film Tourism Experience: मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिकांचे प्रत्यक्ष चित्रीकरण पाहण्याची व कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

मुंबईत (Mumbai) येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (Live Shooting) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बॉलिवूड हे देशासह जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे, त्यामुळे लाईव्ह फिल्म शूटिंग बघण्यास मिळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचाही यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टिव्ही मालिका आदींचे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. याशिवाय मुंबईत यापूर्वी चित्रपटांचे जे शूटिंग झाले त्या स्पॉटवर उतरण्यापूर्वी बसमध्ये त्या चित्रपटातल्या त्या स्थळाचा भाग दाखविला जाईल, व नंतर ते लोकेशन दाखविले जाईल. तसेच हॉलीवूडमध्ये लॉस अँजेलीस–बेव्हरली हिल्सची टूर केली जाते, त्याप्रमाणे वांद्रे (पश्चिम), जुहू, लोखंडवाला, सातबंगला या भागांमधून प्रमुख सेलिब्रेटी कलाकारांचे बंगले, निवासस्थाने दाखविली जातील. एकंदरीतच संपूर्ण चित्रपटसृष्टी पर्यटनाचा अनुभव (Complete Film Tourism Experience) या टूरद्वारे केला जाईल. (हेही वाचा: बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री)

यासह राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील खाद्यसंस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच स्थानिक व घरगुती पदार्थ पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे पर्यटकांना अधिकृत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच मुंबई फेस्टिवलसाठी एक्सप्लोरबी प्रा. लि. यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईमध्ये 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.