रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' (Gully Boy) या चित्रपटाची 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीतील जगातील सर्वोत्कृष्ट आणि मानाचा समजला जाणारा असा पुरस्कार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने या चित्रपटाची दखल घेत सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या विभागासाठी या सिनेमाची निवड केली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झोया अख्तर (Zoya Akhtar)दिग्दर्शित या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याने तिचा भाऊ आणि सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने ट्विट करुन आपल्या बहिणीचे अभिनंदन केले आहे.
FFI चे महासचिव सुपर्ण सेन यांनी पीटीआयला सांगितले की, यंदा ऑस्करसाठी भारतातील 27 चित्रपट होते. त्यात गली बॉय सह उरी द सर्जिकल स्ट्राइक, केसरी, बधाई हो यांसारखे बरेच चित्रपट या शर्यतीत होते. मात्र या सर्वांवर मात करत गली बॉय ने बाजी मारली आहे. अभिनेता फरहान अख्तर याने ही आनंदाची बातमी ट्विटरवर शेअर करत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करुन FFI चे विशेष आभार मानले आहे.
फरहान अख्तर चे ट्विट:
#GullyBoy has been selected as India’s official entry to the 92nd Oscar Awards. #apnatimeaayega
Thank you to the film federation and congratulations #Zoya @kagtireema @ritesh_sid @RanveerOfficial @aliaa08 @SiddhantChturvD @kalkikanmani & cast, crew and hip hop crew. 🕺🏻 pic.twitter.com/Eyg02iETmG
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) September 21, 2019
या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.
यापूर्वी झोया अख्तरने 'लक बाय चान्स', 'जिंदगी न मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' आदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ऑस्कर पुरस्कार च्या नामांकनच्या अंतिम यादी 13 जानेवारीला घोषित केली जाईल आणि 9 फेब्रुवारी 2020 मध्ये भव्यदिव्य असा ऑस्कर पुरस्कार 2020 होणार आहे.