Lalbaugcha Raja (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2021) तयारी सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीचा सण 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. महाराष्ट्रामध्ये या उत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळते. राज्यात अष्टविनायक, सिद्धिविनायक, दगडूशेट हलवाई सोबतच मुंबईचा लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) हे असे गणपती आहे जिथे या दहा दिवसांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक व्हायरल होत असतो. आता नुकतेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘लालबागच्या राजाची पहिली झलक’ असे सांगत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अल्पावधीतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरलही झाला आहे, मात्र आता माहिती मिळत आहे की हा व्हिडिओ यावर्षीचा नसून जुना आहे.

लालबागचा राजा हा संपूर्ण देशात लोकप्रिय असा गणपती आहे. दरवर्षी या गणपतीची मूर्ती व सजावट यांची चर्चा असते. अमिताभ यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले- ‘ओम गण गणपतये नमः.. गणपती बाप्पा मोरया..पहला दर्शन, लालबागचा राजा.’ अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ यंदाचा नसून, खूप जुना आहे. गेले काही दिवस हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार हा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा म्हणजे 2016 चा आहे. या व्हिडिओमधील गर्दी पाहूनही लक्षात येते हा व्हिडिओ 2021 चा नाही. सध्या देशावर कोरोना विषाणूचे सावट असल्याने राज्यात गणेशोत्सव अगदी सध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. शासनाने या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यानुसार गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूटांची आणि घरगुती गणपतीकरीता 2 फूटांची असावी असे सांगितले आहे. (हेही वाचा: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!)

सोबतच राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवादरम्यान यामध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही, असेही सांगितले आहे. (हेही वाचा: घरच्या घरी 'या' सोप्या आयडिया वापरून करा गणपती बाप्पासाठी खास सजावट (Watch Video)

दरम्यान, लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ आहे. याची स्थापना 1934 मध्ये चिंचपोकळीच्या कोळींनी केली होती. लालबागचा राजा 'नवसाचा गणपती' मानला जातो. या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची 5 किलोमीटरपर्यंत लांब रांग लागते. लालबागच्या गणेशमूर्तीचे विसर्जन दहाव्या दिवशी गिरगाव चौपाटीवर केले जाते.