
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट देशात कायम असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहायला मिळत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिच्या वडीलांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. दिशा पटानी हिचे वडील जगदीश पटानी (Jagdish Patani) हे उत्तर प्रदेशातील विद्युत विभागात Vigilance Unit चे डेप्युटी एसपी म्हणून कार्यरत आहेत. अलिकडेच ते ट्रान्सफर घोटाळ्याच्या तपासणीसाठी लखनऊला गेले होते. त्यावेळेस त्यांच्यासह अजून दोन अधिकारी होते. दरम्यान या तिघांचाही कोरोना व्हायरस चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर झोनल ऑफिस 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश राज्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत असून सध्या हा आकडा 1 लाखांच्या पार गेला आहे. तर 1857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने 19 लाखांचा टप्पा पार केला आहे. या रुग्णसंख्येत दिवसागणित मोठी वाढ होत आहे.
दिशा पटानी हिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर लवकरच ती सलमान खान याच्या 'राधे द मोस्ट वांटेड भाई' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान खान याने महबूब स्टुडिओ बुक केला आहे.
दरम्यान यापूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन यांच्यासह आराध्या बच्चन यांनाही कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. बिग बि यांच्यासह ऐश्वर्या, आराध्या यांच्या प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अभिषेक बच्चन याच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.