Karan Johar (Photo Credits: File Image)

रिपोर्ट्सनुसार गोव्यातील (Goa) एका गावामध्ये दीपिका पादुकोण स्टारर फिल्मच्या क्रूने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, प्लास्टिकची भांडी तसेच वापरलेली पीपीई किट अशीच कचऱ्यासारखी फेकून दिली होती. क्रूच्या अशा गैरजबाबदार वागणुकीमुळे परिसरातील लोक पर्यावरणाबाबत चिडले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरचे (Karan Johar) प्रॉडक्शन करीत आहे. आता फिल्ममेकर करण जोहरची प्रॉडक्शन कंपनी धर्मा प्रॉडक्शन (Dharma Productions) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गोवा सरकारने फिल्म निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनला माफी मागण्यास सांगितले आहे. जर कंपनीने असे केले नाही तर, प्रॉडक्शन हाउसला दंड आकारला जाईल, असे सांगितले आहे.

गोव्यात शूटिंग संपल्यानंतर उत्तर गोव्यातील नेरुळ येथील रहिवाशांनी दीपिका पादुकोण स्टारर चित्रपटाच्या क्रूने त्यांच्या गावात टाकलेला कचरा दर्शविणारे व्हिडिओ शेअर केले होते, त्यानंतर हा वाद निर्माण झाला. ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, गोव्याच्या राज्य एन्टरटेन्मेंट सोसायटीने (ESG) मंगळवारी धर्मा प्रॉडक्शनने नियुक्त केलेल्या लाइन प्रोड्यूसरला कारणे दाखवा नोटीस बजावली. गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकेल लोबो यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, धर्मा प्रॉडक्शनच्या संचालकांनी किंवा मालकांनी जागोजागी कचरा टाकल्याबद्दल आणि परिसर अस्वच्छ केल्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागावी.

या वादामध्ये अभिनेत्री कंगना रनौतने उडी घेतली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत तिने ट्वीट केले आहे, ज्यामध्ये ती म्हणते, ‘चित्रपट उद्योग हा देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेसाठीच एक विषाणू नाही, तर आता हा उद्योग पर्यावरणासाठीही खूप धोकादायक बनला आहे. प्रकाश जावडेकर या तथाकथित बड्या प्रॉडक्शन हाऊसची बेजबाबदार,  भयानक वागणूक पहा आणि कृपया मदत करा.’

कंगनाने दुसर्‍या ट्विटमध्येही लिहिले आहे, ‘ही असंवेदनशील वागणूक अत्यंत निराशाजनक आहे. फिल्म युनिटसला महिला सुरक्षा, आधुनिक पर्यावरणीय ठराव, चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि कामगारांना गुणवत्ता युक्त अन्न अशा संदर्भात कठोर नियमांची आवश्यकता आहे. या बाबींची तपासणी करण्यासाठी शासनाने योग्य विभाग तयार करणे महत्वाचे आहे.’ (हेही वाचा: Karan Johar च्या घरी झालेल्या सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये ड्रग्स सेवनाचा NCB ला कोणताही पुरावा मिळालेला नाही- रिपोर्ट्स)

दरम्यान, धर्मा प्रॉडक्शनकडून नियुक्त केलेल्या लाईन प्रोड्युसरने याबाबत सांगितले, ‘ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या स्थानिक कंत्राटदाराकडून दररोज कचरा उचलण्यात येतो, मात्र फक्त रविवारीच तो उचलला गेला नाही व त्याच वेळी हे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले.’